अंबरनाथः जगातील वाईट आक्रमक प्रजातींपैकी एक असलेल्या आणि मानवी मेंदूच्या आजारांसाठी वाहक ठरणाऱ्या अफ्रिकी गोगलगायीचा प्रादुर्भाव ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील एका उद्यानात पाहायला मिळाला आहे.

गेल्या काही वर्षात निर्माण झालेल्या जैविक अतिक्रमणांमध्ये या गोगलगायीचा समावेश असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात. उघड्या हातांनी हिली स्पर्श केल्यास संसर्ग होऊन व्यक्ती आजारी होऊ शकतो. त्यामुळे तसेच जैविक साखळीवरही या गोगलगायींचा परिणाम होऊ शकतो. सध्या अंबरनाथच्या अटल उद्यानातील झाडे, लोखंडी संरक्षक जाळ्यांचे पापुद्रे, भिंतींचे रंग या गोगलगायींनी फस्त केल्याचे दिसून येते आहे.

जायंट अफ्रिकन लॅंडस्नेल असे या गोगलगायीचे नाव आहे. पूर्व अफ्रिकेत १८ व्या शतकात ही गोगलगाय आढळून आल्याचे पुरावे आहेत. मात्र भारतात ही मॉरिशियसमधून १८४७ च्या सुमारास आल्याचे बोलले जाते. लॅंड स्नेल डायव्हर्सिटी अर्थात भूमीतील शिंपल्यांच्या वैविध्यतेवर पीएचडी करणारे शिवळे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक अनिकेत मराठे यांनी या गोगलगायीच्या संदर्भात सांगतात की, नर्सरीच्या झाडांमधून यांची अंडी वाढतात.

कुजलेला पालापाचोळ्यापासून भिंतीचे रंग, लोखंडी वस्तूंचे पापुद्रे, झाडे, हिरवा पाला, पाने अशा सर्वांना हे खाद्य बनवतात. हिरवटपणा, दमटपणा अशा वाटावरणात त्यांची वाढ मोठ्या प्रमाणावर होते. यांच्यावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर त्यांची संख्या वेगाने वाढू शकते. जैविक साखळीवर या गोगलगायी प्रभाव करतात, असेही मराठे सांगतात.

सध्या अंबरनाथ पूर्वेतील कानसई भागात असलेल्या अटल उद्यानात या गोगलगायींचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. येथे दररोज फेरफटका मारणारे संकेत सबनीस यांनी हिच्या उद्यानातील वास्तव्याबाबत माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून मी दररोज या गोगलगायींची संख्या पाहतो आहे. ती वाढते आहे. त्यांनी अनेक झाडांच्या पानांना खाऊन संपवले आहे. अनेक झाडांना फळे लागल्याप्रमाणे त्या चिटकलेल्या आहेत. उद्यानाच्या लोखंडी संरक्षण जाळीवर, भितींवर, खाडांच्या खोडांवर लांबलांबपर्यंत या पोहोचल्या आहेत, असेही सबनीस सांगतात.

या गोगलगायीची विष्टाही मोठ्या प्रमाणावर उद्यानात पसरलेली दिसते आहे. उद्यानाच्या शेजारीच एक शाळा आहे. त्यातील अनेक विद्यार्थी शाळा भरण्यापूर्वी, शाळा सुटल्यानंतर अनेक विद्यार्थी येथे खेळत असतात. त्यातील काही मुले या गोगलगायींसोबतही खेळतात. त्यामुळे या गोगलगायींवर वेळीच नियंत्रण मिळवण्याची मागणी सबनीस करतात.

कशी असते ही गोगलगाय

ही गोगलगाय २० सेंटीमीटरपर्यंत वाढते. गोल शंखासारखी ही गोगलगाय चॉकलेटी रंगाची असते. शंखाच्या वरच्या टोकाला त्याच रंगाचे पट्टे असतात. तिची विष्ठा त्याच ठिकाणी पडलेली असते. त्यामुळे तीचे वय कळू शकते.