साहित्य, नाटय़ आणि चित्रपट माध्यमांच्या सामर्थ्यांचा वेध
नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमे भिन्न असून नाटकांवर नव्हे तर त्यातील सशक्त कथाबीजावर बेतलेले चित्रपटच यशस्वी होऊ शकतात, असा सूर ‘नाटकांचे माध्यमांतर-काय हरवतंय, काय गवसतंय’ हा विषयावर परिसंवादात व्यक्त झाला.
‘कटय़ार काळजात घुसली’ आणि ‘नटसम्राट’ या दोन नाटकांवर आधारित सिनेमांना लोकप्रियता मिळाली असली तरी मराठीत नाटकांवर बेतलेले फार थोडे सिनेमे यशस्वी झाले, याची आठवण सुप्रसिद्ध समीक्षक सुधीर नांदगांवकर यांनी परिसंवादात करून दिली. तसेच व्ही. शांताराम यांना ‘कटय़ार..’ नाटकाचा शेवट बदलून त्यावर चित्रपट करायचा होता, मात्र लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी शेवट बदलण्यास नकार दिला होता, हेही त्यांनी सांगितले.
पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या अंमलदार नाटकावरून त्याच नावाने चित्रपट बनविला होता. आचार्य अत्रे यांनी लग्नाची बेडी या नाटकावरून ब्रह्मघोटाळा हा चित्रपट केला, मात्र नाटकाप्रमाणे चित्रपट यशस्वी झाला नाही, असेही ते म्हणाले.
कटय़ार आणि नटसम्राट या दोन्ही चित्रपटांची निर्मितीमूल्य उच्च दर्जाची होती.
कटय़ारमध्ये सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांचा अभिनय, सचिन यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रथमच साकारलेली नकारात्मक व्यक्तिरेखा तसेच नटसम्राटमधील नाना पाटेकर यांची व्यक्तिरेखा याविषयी प्रेक्षकांना त्यातही युवा प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे हे चित्रपट यशस्वी झाले, असे मत अमोल परचुरे यांनी व्यक्त केले. विशाल भारद्वाज यांनी शेक्सपियरच्या नाटकांवर आधारित केलेले ओंकारा, मकबुलसारखे चित्रपट हे उत्तम माध्यमांतर होते, असेही त्यांनी सांगितले.
नाटक ते माध्यम सापासारखे कात टाकणारे असून ते काळानुरूप बदलून टिकून राहील, असा विश्वास सुबोध भावे यांनी व्यक्त केला.
अभिनेते प्रशांत दामले यांनी मराठी नाटकांवर चित्रपट आणि मालिका बनतात, मात्र चित्रपटांवर आधारित नाटके येत नाहीत. कारण नाटक हे अस्सल आणि श्रेष्ठ आहे. वर्षभरात मोजकी १५ नाटके आणि २० चित्रपट प्रदर्शित झाली, तर सर्वाचेच भले होईल, असेही मत दामले यांनी व्यक्त केले. वासंती वर्तक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

नाटक हे लेखकाचे, तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम-मतकरी
नाटक हे लेखकाचे, तर चित्रपट हे दिग्दर्शकाचे माध्यम असते. कथा अथवा कादंबरी वाचल्यावर वाचकांच्या मनात जे चित्र उभे राहते, ते चित्रपटात उतरेलच असे नाही. साहित्यात वाचकांना स्वातंत्र्य असते. नाटकामध्ये काही गोष्टी सूचकपणे नेपथ्याच्या माध्यमातून सांगितल्या जातात, तर चित्रपटात सर्व काही तपशिलात दाखविलेले असते, असे मत गणेश मतकरी यांनी व्यक्त केले.