परदेशात तीन महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर वाहन परवाना दिला जातो पण, त्या तुलनेत आपल्या देशात लवकर वाहन परवाना मिळतो आणि काही वेळेस त्यांची धड तपासणी केली जात नाही, अशी टीका सिने अभिनेता अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी ठाण्यात आरटीओच्या कारभारावर केली. तसेच या विभागाने वाहन परवाना देताना काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये ठाणे पोलिसांनी ‘रस्ता सुरक्षा-एक आव्हान’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  अमिताभ बच्चन उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘ठाणे ट्रॉफिक अॅप’ चे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी ठाणे पोलीस आयुक्त विजय कांबळे, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण, पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, संगीतकार कौशल इनामदार, गायक अभिजीत सावंत, मानसोपचारतज्ज्ञ हरीश शेट्टी आदी उपस्थित होते.  या कार्यक्रमादरम्यान बच्चन यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. जोपर्यंत मराठी भाषा शिकणार नाही, तोपर्यंत ती भाषा येणार नाही. यामुळे ती भाषा आता शिकत आहे. यामुळे मराठी भाषा पूर्ण शिकल्यानंतरच बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मला जे काही मिळाले, ती माझ्यासाठी मोठी संपत्ती आहे. इथे नाव, प्रसिद्धी आणि सर्वच काही भरभरून मिळाले. यामुळे या भूमीला मी वंदन करतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले. मी गाडी चालविताना सीट बेल्ट लावतो. कारण, माझ्याकडे बाबांची नाही तर माझी स्वत:ची गाडी आहे आणि वय झाल्यामुळे आता मैत्रिणींचा जमानाही गेला आहे. यामुळे मी स्वत:साठी नियमांचे पालन करतो, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला अप्रत्यक्ष टोला लगावला.
विनामूल्य ब्रॅण्ड अॅम्बेसेडर
गुजरातमध्ये पर्यटन विकू शकतो तर महाराष्ट्रात वाहतूक जनजागृती करण्याइतपत नक्कीच काम करू शकतो, असे सांगत बच्चन यांनी या कामासाठी विनामूल्य ब्रॅण्ड अॅम्बेसेडर होण्याची तयारी दर्शवली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत  चर्चा झाली असून अजूनही काहीच निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र, लवकरच यावर निर्णय होईल, अशी आशाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.