संत गोन्सालो गार्सिया चर्च
आगाशी चर्चचा इतिहास हा नवोदित इतिहासकारांना समजणे तितकेसे सोपे नाही कारण आगाशीला दोन चर्च होती. काही इतिहासकारांनी त्याची गल्लत केली आहे, म्हणून इतिहासकार नक्की कोणत्या चर्चविषयी लिहितात ते नवोदितांना समजले पाहिजे. त्यापैकी एका चर्चचे नाव ‘अवर लेडी ऑफ लाइट’ म्हणजे ‘प्रकाशाची माता’, दुसरे चर्च ‘संत जेम्स चर्च.’ यापैकी पहिले चर्च अस्तित्वात नाही. म्हणून त्या चर्चबद्दल माहिती जर कोणत्या इतिहासाच्या पुस्तकात दिली गेली असेल तर ती संत जेम्सची आहे, असे समजू नये.
पोर्तुगीज लोक आगाशीला येण्यापूर्वी आगाशी हे बंदर होते. ‘सात काशी एक आगाशी’ अशी त्याची ख्याती होती. पोर्तुगीज आल्यानंतर त्यांनी या बंदरावर आपला मुक्काम केला. आजूबाजूची गरीब परिस्थिती पाहून आणि जवळपास असलेली अनाथ मुले पाहून त्यांनी एक अनाथालय चालू केले आणि त्याच्यालगत १५६८च्या काळात संत जेम्स चर्च उभे केले. अनाथालय आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, चर्च मात्र राहिले. मराठय़ांच्या स्वारीच्या वेळी ‘प्रकाशाची राणी’ हे चर्च जसे नामशेष झाले, तसे संत जेम्स चर्च नामशेष झाले नाही, मात्र बऱ्याच प्रमाणावर त्याची नासधूस झाली. १७६०च्या दरम्यान या चर्चची पुनर्बाधणी झाली. त्याकाळी तेथे फादर फ्रान्सिस्को दा तावोरा हे कार्यरत असल्याची दस्तावेज आहे. संत जेम्स याला पोर्तुगीज भाषेत सांथिआगो असे म्हणत, यावरून आजही आगाशी येथील बऱ्याच लोकांचे नाव सांथिआगो आहे. प्रत्येक पिढीत या चर्चची कमी-जास्त प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र इ.स. १९०० त्याचे नूतनीकरण करण्यात आले आणि त्याला विस्तार विभाग जोडण्यात आला.
चर्चच्या आजूबाजूला हिरवी-गर्द बागायती शेती असून केळी व नारळी-पोफळीच्या सहवासात हे चर्च पिढय़ान्पिढय़ा उभे आहे. जमिनीच्या पातळीवर असलेल्या या दक्षिणाभिमुख चर्चच्या दोन्ही अंगांना दोन उंचपुरे मनोरे आहेत. यापैकी एका मनोऱ्यावर असलेल्या चर्चच्या घंटेचा नाद अर्नाळा ते सत्पाळा गावापर्यंत ऐकू येतो.
पूर्वी या चर्चच्या गाभाऱ्यात लाकडी नक्षीदार वेदी होती. ती जाऊन आता त्या जागी मार्बलची नवीन वेदी आली आहे. चर्चच्या पूर्वेकडे फादर यांचे जे जुने निवासस्थान होते, ते तोडून १९७८ मध्ये चर्चचा विस्तार विभाग म्हणून ते चर्चला जोडण्यात आले. सध्या या गावात ५७५ कुटुंबे असून त्याची लोकसंख्या ४२००च्या आसपास आहे आणि तेथील प्रमुख धर्मगुरू फा. व्हेलेंटाइन पावकर व स्टीफन मच्याडो हे आहेत.
शैक्षणिक योगदान
या चर्चच्या अवतीभोवती मोकळी जागा आहे. १९०४ मध्ये या जागेवर इंग्रजी माध्यमाची शाळा उभी करण्यात आली. १९२८ मध्ये बंद पडलेली शाळा १९३८ मध्ये मराठी शाळा म्हणून उदयास आली. त्यात फा. सॉक्रेटिस डिसोजा यांची दूरदृष्टी दिसून येते. आज त्या ठिकाणी शाळा उभी असून त्यास फादर डॉमनिक परेरा, फा. बेनेडिक्ट मुनिस यांचे श्रम कामी आले आहे. या इमारतीचे उद्घाटन पद्मभूषण कार्डिनल ग्रेशस यांच्या शुभहस्ते १५ मे १९७७ मध्ये झाले. आगाशीमध्ये मराठी शाळेच्या जोडीलाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा उदयाला आल्या आहेत. त्यात ‘प्रेषितांची राणी’ या संघाच्या सिस्टरांचा नामोल्लेख व्हायलाच पाहिजे. पंचक्रोशीच्या जडणघडणीत या सिस्टरांचे मोलाचे योगदान आहे.