पण पक्ष्यांचा देश म्हणजे कोणता? तर पक्षी जेथे निवास करतात, जेथे पिल्लांना जन्म देतात. तो त्यांचा देश. ती त्यांची मायभूमी. त्यामुळे स्थलांतर करून पक्षी जगाच्या कुठल्याही पाठीवर असले तरी उन्हाळय़ात, विणीच्या हंगामात आपल्या मायभूमीला परत येतात. पण त्यासाठी निरनिराळय़ा संकटांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारे तावूनसुलाखून निघालेले यशस्वी स्थलांतर करून परत आपल्या मायभूमीत आलेला पक्षी हा नक्कीच तगडा, ताकदवान असतो. त्याने स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केलेले असते. लगेच तो आपला जोडीदार शोधतो. पिलांना जन्म देऊन, त्यांचा सांभाळ आणि संगोपनाच्या कामाला लागतो. या सर्वाची ओढ त्याला मायभूमीवर परत घेऊन येते.
स्थलांतर करणाऱ्यांमध्ये आकाराने आणि वजनाने छोटे पक्षी असतात, तसे मोठे पक्षीही असतात. फिंच नावाचा चिमणीएवढा, दहा ग्रॅमपेक्षाही कमी वजनाचा पक्षी जमिनीच्या जवळून स्थलांतर करतो. तर सैबेरियन क्रेन हा साडेआठ किलो वजनाचा पक्षी खूप उंचीवरून स्थलांतर करतो. पक्षी वजनाला जेवढा कमी तेवढा जमिनीच्या जवळून आणि वजनाने जेवढा जास्त तेवढा जास्त उंचीवरून स्थलांतर करतो. मात्र, या सर्वाच्या स्थलांतराचा उद्देश एकच असतो.
आपल्या महाराष्ट्रात भिगवण येथील बॅकवॉटरवर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांतील एक देखणा पक्षी आहे, बार हेडेड गूझ. मराठीत याला पट्टकादंब हंस असे म्हणतात. हा राखाडी रंगाचा, बदकाच्या जातीतला म्हणजे पायांना पडदे असलेला पक्षी आहे. ७५ सेमी इतक्या मोठय़ा आकारच्या या पक्ष्याची अर्धी मान राखाडी रंगाची असते. पण मानेच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे असतात. तर पांढऱ्या डोक्यावरती दोन काळे पट्टे असतात. असे उलटसुलट काळे-पांढरे कॉम्बिनेशन एकदा पक्षी पाहूनही कायमचे लक्षात राहते. असा हा रुबाबदार पक्षी नेहमी घोळक्यात असतो. मग तो शेतात धान्य खाताना असो, पाण्यात पोहताना असो वा पाण्याच्या काठावर विश्रांती घेताना असो, आपली मित्रमंडळी सोडण्यास तो तयार नसतो.
दिवसा डोळे मिटून विश्रांती घेणारे हे पक्षी एक ठरावीक अंतर राखून आपल्याला जवळ येऊ देतात. पण आपण जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर, आँग आँग असा आवाज करून आपली नाराजी दर्शवतात आणि थोडी पुढची पुढची जागा पकडून पुन्हा डोळे मिटून घेतात. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच येणारे हे बार हेडेड गूझ किंवा पट्टकादंब हंस मार्चपर्यंत येथे मुक्काम करतात आणि लगेचच तिबेटच्या दिशेने उलटय़ा प्रवासाला लागतात. भारतात लडाख येथे एप्रिल, मे मध्ये घरटी बांधून पिल्लांना जन्म देतात. तिबेटमधून निघालेला हा पक्षी जास्तीत जास्त अंतर रात्रीच्या वेळी कापतो आणि भारतात येतो. येताना २९ हजार ५०० फूट म्हणजे ९ हजार मीटर इतक्या उंचीवरून एव्हरेस्ट शिखरालाही पंख लावून येण्याची हिंमत ठेवतो. इतकेच नव्हे तर या प्रवासात कमी प्राणवायू असणारा भाग त्याला पार करावा लागतो. अशा अगणित अडथळय़ांची शर्यत पार करून आलेल्या या पट्टकादंब हंसाचे आयुष्यात एकदा तरी दर्शन घ्यावेच.
मेधा कारखानीस
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2015 रोजी प्रकाशित
असे पाहुणे येती : एव्हरेस्टलाही स्पर्श करणारा पट्टकादंब
थंडीचा कडाका वाढायला लागतो, तसे पक्षी थंड प्रदेशाकडून उबदाल तापमानाच्या प्रदेशाकडे स्थलांतर करायला सुरुवात करतात.
First published on: 04-02-2015 at 12:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about bird migration