हरियाली संस्थेचे संस्थापक पूनम सिंगवी यांचा निरोप समारंभ नुकताच पार पडला. १९९५ ते २०१५ अशी २० वर्षे, पूनमजीनी केवळ हरियाली संस्थाच जोपासली नाही तर ठाणे शहरासभोवतालचा निसर्ग जोपासला, वाढवला. त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे ठाणेकरांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणविषयी संवेदनशीलता निर्माण केली. २० वर्षे तन, मन आणि धन अर्पून हे कार्य केल्यावर ‘इदं नं मम’ अशा गीतेतील मंत्राप्रमाणे पूनम सिंगवीसर अलगद ‘हरियाली’च्या दैनंदिन कार्यातून बाहेर पडले आहेत.
१९ ७० मध्ये शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्याच वर्षी मुलुंडला नव्याने सुरू झालेल्या मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मी प्रवेश घेतला होता. कॉलेजमध्ये हायकर्स क्लब स्थापन झाला होता. त्याची जबाबदारी माझ्याकडे होती. दोन तीन पावसाळी हाईक झाल्यावर डिसेंबर महिन्यात दोन दिवस भीमाशंकरला जाण्याचे ठरले. कर्जत कशेळी, तुंगीचा डोंगर चढून भीमाशंकरचा डोंगर चढण्याअगोदरच बहुतेक मंडळी ढेपाळली होती. बघता बघता संध्याकाळ झाली. १०० च्या वर असलेली मुले विखुरली गेली होती. दिवसा रम्य वाटणारे जंगल आणि डोंगर आता भीषण वाटू लागले. अशा या आणीबाणीच्या वेळी आमचे अकौन्टसीचे प्राध्यापक सिंगवी सर मदतीला आले. त्या रात्री पहिल्यांदा सिंगवीसरांचा आश्वासक हात माझ्या पाठीवर पडला. पुढील काळात मार्गदर्शक आणि फिलॉसॉफर या भूमिकेतून, विविध कारणासाठी सरांचा हात पाठीवर राहिला.
धुळे शहरापासून जळगाव रस्त्यावर चार किलोमीटरवर असलेले छोटेसे फागणे गाव सरांचे जन्मस्थान. १९४२ सालचा जन्म. वडील उत्तमचंद एक सर्वसाधारण शेतकरी. उत्तमचंदना वकील होण्याची इच्छा होती. मात्र घरच्या परिस्थितीमुळे त्यांना घरच्या शेतीकडे लक्ष द्यावे लागले. परंतु गावातील सर्वात हुशार व्यक्ती म्हणून त्यांना मान होता. आठ भावंडांत पूनमजी खालून दुसरे. घराजवळचे मंदिर त्यांच्यासाठी संस्कार केंद्र होते. देवळात सतत पोथी, पुराणे यांची पारायणे चालत असत. त्याचे संस्कार बालवयात छोटय़ा पूनमवर होत होतेच. गावात भरणाऱ्या संघाच्या शाखेत जाण्याची संधी मिळाल्यामुळे देशाची प्राचीन परंपरा, जाज्वल्य इतिहास आणि देशभक्ती यांचे संस्कार होत होतेच. त्याचबरोबर सेवादलाचेही संस्कार एकाच वेळी त्यांच्यावर होत होते.
गावातील शाळा सातवीपर्यंतच असल्याकारणाने आठवीनंतर धुळे येथील जे.आर. सिटी हायस्कूल या शाळेत त्यांनी प्रवेश घेतला. या शाळेत आठवीपासून कॉमर्स शाखेतील विषय शिकण्याची सोय असल्याने त्यांनी कॉमर्स शाखेची निवड केली. शालान्त परीक्षेत अतिशय चांगले गुण मिळवून, पुढील शिक्षणासाठी त्यांनी पोद्दार कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.पोद्दार कॉलेजमधील वास्तव्याचा सरांच्या आयुष्यात अनेक कारणांनी विशेष महत्त्व आहे. प्रथमत: आपले गाव आणि धुळेसारख्या तत्कालीन ग्रामीण भागात शालेय शिक्षण घेतल्यावर मुंबई त्यांच्यासाठी स्वगुणांना वाव आणि आव्हान देणारे शहर ठरले. या आव्हानाचा सरांनी कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड न ठेवता स्वीकार केला. जोडीला चौफेर वाचन होते. वेळोवेळी मिळालेल्या संधींचा फायदा घेऊन आपले व्यक्तिमत्त्व त्यांनी घडवले. बालपणी झालेल्या संघाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विचारांची पगडी डोक्यावर असूनही तारुण्यात त्याहून वेगळेविचार स्वीकारण्याची मानसिकता आणि वैचारिकता त्यांनी मिळवली होती. समाजवादी नेते एस.एम. जोशी, नानासाहेब गोरे, लढाऊ कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस यांच्या विचाराने ते आकर्षित झाले होते. कुठल्याही व्यक्तीचा अथवा विचारांचे ओझे न वाहता, स्वत:ची एक थिअरी सरांनी जोपासली होती. कुठल्याही व्यवस्थापन शिक्षण संस्थेत न जाता जीवनाच्या विद्यापीठात ते बरेच काही शिकले.
सरांचे कॉलेजमधील दिवस संपन्न करणारे प्रभावशाली व्यक्तिमत्त्व म्हणजे पोद्दार कॉलेजमधील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आणि पुढे मुलुंड कॉलेजचे प्राचार्य झालेले डॉ. भगवान बापट. सिंगवीसरांच्या पुढील सर्व उपक्रमांना नेहमीच बापटसरांच्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन मिळत राहिले. सी.ए.ची पूर्व परीक्षा देत असताना आईच्या आग्रहाखातर पूनमजीना लवकर लग्न करावे लागले. सौ. पुष्पलताबाईचे सिंगवीसरांच्या जीवनात एक अढळ स्थान आहे.
लग्न झाल्यावर सर मुलुंडमध्ये स्थायिक झाले. पुढील अनेक वर्षे मुलुंड ही सरांची सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडाविषयक कर्मभूमी होती. मुलुंडमधील वसंत व्याख्यानमालेचे ते एक सक्रिय कार्यकर्ते होते. व्याख्यानमालेमुळे मुंबईतील विविध क्षेत्रातील अग्रणी व्यक्तींशी त्यांच्या ओळखी झाल्या. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रथम वर्षांपासून प्राध्यापकी, त्यामुळे कॉलेजमधील सहकारी असलेले ओक, भोळे आणि भिडे इत्यादी प्राध्यापकाशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले. त्याचबरोबर मुलुंडमधील जुने रहिवासी डॉ. प्रधान, अॅड. देशपांडे, गद्रे, अशा समविचारी व्यक्तींबरोबर मैत्री जुळली. १९८० मध्ये मुलुंडमध्ये खेळण्याची कुठलीही सुविधा नाही हे लक्षात घेऊन याच मित्र मंडळींना बरोबर घेऊन सिंगवीसरांनी मुलुंड जिमखान्याची स्थापना केली. १९९५ मध्ये सिंगवीसर ठाण्यात स्थायिक झाले. मुलुंडचे नुकसान, हा ठाण्याचा फायदा होता. सर ठाण्यात आल्यावर त्यांचा निकटचा सहवास मिळू लागला. गप्पांच्या ओघात नष्ट होणारी वनराई आणि ढासळते पर्यावरण याची व्यथा ते बोलून दाखवत असत. चर्चा करता एका क्षणी ‘लक्ष लक्ष झाडे लावू’ ही त्यांनी स्वरचित कविता ऐकवली व १९९६ मध्ये ‘हरियाली’ संस्था जन्मली.
‘हरियाली’ हे सिंगवीसरांनी जागेपणी बघितलेले एक सुंदर स्वप्न होते. तनमनधन अर्पून त्यांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात आणले. बालपणात आपल्या पालकांसोबत गावातील मंदिरात गीतेवर होणाऱ्या प्रवचनातील ‘निष्काम कर्मयोग’ सिंगवीसरांनी नुसतेच ऐकले नाही तर पुढील आयुष्यात तो आपल्या अंगात बाणवला. सरांच्या पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
– सुरेन्द्र दिघे