रिझव्‍‌र्ह बँकेतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन चाळीस वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्व भागातील वीर सावरकर रस्त्यावर पुष्कराज सोसायटी स्थापन केली. खर्चाची उधळपट्टी न करता सोसायटी कशी चालवावी याचा उत्तम नमुना या सोसायटीने वस्तुपाठ घालुन दिला आहे. माणुसकी जपत, शेजारधर्म पाळत एकाच इमारतीत आपण कसे राहू शकतो, हेही या सोसायटीने दाखवून दिले आहे. दरम्यानच्या काळात आता येथील जमिनीचे भाव कैकपटींनी वाढले आहेत. मात्र या सोसायटीच्या आवारातील निवांत, शांतपणा टिकवून ठेवू आणि गगनचुंबी इमारतींपासून दूरच राहू, या निष्कर्षांप्रत सोसायटी सदस्य आले आहेत.
ए कांतात असलेल्या डोंबिवलीत वाडे संस्कृती रुजत होती. सर्वसामान्य घरांच्या शोधात होते. चाकरमानी गट समूह करून जमीन खरेदी करून हक्काचा निवारा उभारण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी म्हणजे १९७१ च्या दरम्यान, तब्बल ४५ वर्षांपूर्वी डोंबिवली पूर्व भागातील वीर सावरकर रस्त्यावर रेल्वे स्थानकापासून पाच ते आठ मिनिटांच्या अंतरावर रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरी करीत असलेला तरुणांचा एक गट आपले हक्काचे घर शोधण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळचे उमदे नेतृत्व, रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरीला असलेले दादा पांडे या तरुणांचे नेतृत्व करीत होते. डोंबिवली म्हणजे शेती, खाडी परिसरातील दलदलीतील गाव. पुढेमागे या गावाला पण भाव येईल. मुंबईला ये जा करण्याच्या दृष्टीने सोयीस्कर. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने सोपे, असा विचार करून रिझव्‍‌र्ह बँकेत नोकरीत असलेल्या या गटाने डोंबिवलीत एकाच ठिकाणी आपली हक्काची घरे असावीत असा निर्णय करून इमारत उभारणीचा निर्णय घेतला. २२ हजार रुपयांना एक सदनिका पडणार होती. त्यावेळी मिळत असलेल्या पगाराच्या तुलनेत ही किंमत थोडी जास्तच होती. कर्ज, उसनवारी करूनच इमारत उभारणीचे काम करावे लागणार होते. सामाजिक कार्यासह विविध क्षेत्रात ऊठबस असलेल्या दादा पांडेंमुळे बऱ्याच गोष्टी सुलभपणे साध्य झाल्या. या चाकरमानी मंडळींना ‘आरबीआय’ने सुमारे १७ ते १८ हजार रुपयांचे कर्ज दिले. उर्वरित रकमेचा पेच कायम होता. मग, डोंबिवलीतील एका सोसायटीने तीन ते चार हजार रुपयांचे कर्ज दिले. सावरकर रस्त्यावर एक भूखंड इमारतीसाठी मुक्रर करण्यात आला. निविदा प्रक्रिया करून श्री कन्स्ट्र्क्शन या विकासकाला बांधकामाचे काम देण्यात आले. इमारतीचा बांधकाम आराखडा उपासनी आणि देशपांडे या प्रसिद्ध वास्तुविशारदांनी केला. अतिशय सुबकपणे इमारतींची रचना करण्यात आली. चोहोबाजूने ऐसपैस मोकळी जागा ठेवण्यात आली. बांधकामांच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. इमारतीला दोन प्रवेशद्वारे असली तरी दररोज रहिवासी एकमेकांना भेटतील, माणुसकीचा झरा अखंड वाहत राहावा अशा दूरदृष्टीने एकच जीना ठेवण्यात आला.
१९७१ मध्ये पुष्कराज सोसायटीच्या बांधकामाला सुरुवात होऊन १९७२ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. कल्याण, डोंबिवलीच्या विविध भागात हे ‘आरबीआय’मधील कर्मचारी राहत होते. ते सर्व एकाच इमारतीत राहू लागले. ‘पुष्कराज’ इमारतीचे नामकरण करण्यात आले. इमारत उभारताना माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे सिमेंट प्रकरण सुरू होते. सीमेंटचा तुटवडा निर्माण झाला होता. परंतु, दादा पांडे यांनी आपल्या ओळखीतून इमारतीचे बांधकाम थांबणार नाही, यासाठी ओळखीपाळखीतून सिमेंट उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली होती.
सोसायटीच्या मोकळ्या जागेत फुलझाडे लावण्यात आली. दुर्वाचा हिरवा गालिचा असलेली शहरातील ही दुर्मीळ सोसायटी आहे. तीस ते चाळीस वर्षांपूर्वी लावलेल्या रोपांचे आता महाकाय वृक्ष झाले आहेत. त्यामुळे सोसायटी परिसराचे चोहोबाजूने सावली आणि ऊन, वाऱ्यापासून सोसायटीचे संरक्षण होत असते. विविध प्रकारचे पक्षी, त्यांची चिवचिव या ठिकाणी पाहण्यास मिळते. सोसायटीसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक, पाणी सोडण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती यामध्ये पैसे अडकविण्यापेक्षा ही कामे सदस्यांनी स्वत:च करायची ठरवली. म्हणजे सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार रात्री साडे दहा वाजता बंद करायचे आणि पहाटे साडेपाच उघडायचे, पंप हाऊस पाण्याच्या वेळेप्रमाणे चालू करायचे. ही कामे प्रत्येक सदस्याने दर महिन्यासाठी वाटून घेतली आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर करडी नजर ठेवण्यापासून ते सोसायटीत दिवसभरात कोण येऊन गेलेय, इतक्या बारीक हालचालींवर सोसायटी सदस्यांचे लक्ष असते. पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही सोसायटी सदस्य वयाच्या साठ ते सत्तरीत आले तरी तंतोतंत पालन करीत आहेत.
पुष्कराज सोसायटीचा पुनर्विकास केल्यास या ठिकाणी गगनचुंबी निवासी, व्यापारी संकुल उभे राहू शकते. परंतु, पुष्कराज सोसायटीचे सदस्य इमारत पुनर्विकासापासून दूर राहण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत. सुसज्ज वाहनतळ सोसायटीला आहे. नियमित देखभाल व पाच वर्षांंनी सोसायटीची रंगरंगोटी केली जाते. सोसायटीचे नुकतेच संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. ही सोसायटी आणखी वीस वर्षे आहे त्या स्थितीत उभी राहू शकते, असे प्रमाणपत्र संरचनात्मक अभियंत्याने दिले आहे. दिवाकर सामंत, गोविंद अध्यापक, रमेश घाणेकर, हरिश्चंद्र जोशी, दादा पांडे, प्रभाकर म्हसकर, अविनाश अत्रे, चिंदरकर, घरत, कैसारे, परांजपे, महाजन आदी विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचा कारभार सुरू आहे.

सोसायटीतील रत्ने
सोसायटी स्थापन करताना एकत्र असलेली मंडळी आता ७० ते ८० च्या घरात आहेत. मुलबाळे नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. आईबाबा नोकरीला. त्यामुळे घरात सध्या आजी-आजोबा आणि नातवंडे असा हसताखेळता परिवार असतो. सकाळच्या वेळेत शाळेच्या बसथांब्यावर जाऊन नातवंडांना शाळेत पोहचवणारे आजोबा आणि संध्याकाळच्या वेळेत नातवंडांसोबत सोसायटीच्या आवारात खेळणारे, नातवंडांना मनमुराद हुंदडून देणारे आजी, आजोबा असे दृश्य या ठिकाणी पाहण्यास मिळते. खेळासाठी मैदाने नसल्याने बाजूच्या सोसायटींमधील मुले आजोबांची परवानगी घेऊन सोसायटीत खेळायला, सायकल चालविण्यास येतात. सोसायटीच्या आवारात सर्व प्रकारची फूल, फळझाडे आहेत. बाराही महिने पाणी फुलझाडांच्या मुळाशी असल्याने कधी कोणी सदस्य बाहेरून फुलपुडी आणण्याचा प्रयत्न करीत नाही. सकाळची ताजी फुले देवघरातील देवांवर ठेवून येथील प्रत्येक सदस्य मन:शांती मिळवीत असतो. आवळा, आंबा, पेरू, जांभूळ झाडांवरील फळे खाण्यासाठी मुलांची झुंबड उडायची. ताजी फळे मिळावीत म्हणून घरातील ज्येष्ठ सकाळीच उठून पडलेली फळे वेचून ठेवत असत. पुष्कराज सोसायटीत वाढलेल्या स्वाती पांडे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकांच्या शिखर संस्था संघटनेच्या मुख्याधिकारी आहेत. गिरीश घाणेकर जागतिक पातळीवर संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. प्रा. डॉ. मंजिरी घरत-टिळक औषध निर्माण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. समीर जोशी येस बँकेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.