वसईतील मूलचोरी प्रकरणातील धक्कादायक माहिती

एक लाख रुपयांना लहान मूल विकणाऱ्या एका महिलेला माणिकपूर पोलिसांनी बुधवारी अटक केल्यानंतर या मुलाच्या माता-पित्याचा शोध घेण्यात येत आहे. हे मूल मीरा रोड येथील एका महिलेकडून अवघ्या ५०० रुपयांना विकत घेतल्याची माहिती या आरोपी महिलेने पोलिसांना दिली आहे. त्यामुळे मूल विकणाऱ्या महिलेचाही पोलीस शोध घेत आहेत.

वसई रोड रेल्वे स्थानक परिसरात शगिना कय्युम मोहम्मद कुरेशी (४०) ही महिला तीन वर्षांचे लहान मूल विकण्याचा गेल्या महिन्यापासून प्रयत्न करत होती. परंतु घरकाम करणाऱ्या एका महिलेच्या सतर्कतेनंतर माणिकपूर पोलिसांनी तिचा डाव हाणून पाडला. मंगळवारी रात्री सापळा लावून या महिलेला बाळाला एक लाख रुपयांना विकताना अटक केली होती. हे बाळ विकण्यासाठी ती गेल्या महिन्याभरापासून वसई स्थानक परिसरात फिरत होती. न्यायालयाने शगिनाला २७ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हे बाळ कुठून आणले त्याचा तपास पोलीस करत आहे. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होती. आता तिने हे बाळ मीरा रोडच्या एका महिलेकडून अवघ्या ५०० रुपयांना विकत घेतल्याचे सांगितले. मूल विकणारी महिला एका बारमध्ये काम करत असल्याचेही तिने सांगितले. मात्र कुठला बार आणि मीरा रोडमध्ये कुठे ते ती सांगू शकलेली नाही. माणिकपूर पोलिसांचे एक पथक दिवसभर मीरा रोड आणि भाईंदरमधील बार आणि परिसरात या बाळाचा तपास करत आहेत. हे बाळ दोन महिन्यांपूर्वी शगिनाला मिळाले होते. त्यामुळे त्या कालावाधीत कुठे लहान मूल चोरीच्या घटना नोंद झाल्या आहेत का त्याचाही पोलीस तपास करत आहेत.

ही महिला मूळची बंगाली असून ती मोडक्यातोडक्या हिंदी भाषेत बोलते. जर हे बाळ कुठल्या महिलेकडून विकत घेतले असेल तर त्या महिलेनेही ते कुठून तरी पळवून आणले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. ही महिला सराईत गुन्हेगार आहे.

तिच्या दाव्यातील सत्यता आम्ही पडताळून पाहात आहोत, परंतु सर्व शक्यता तपासून आम्ही बाळाच्या माता-पित्यांचा शोध घेत आहोत, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी या बाळाचे छायाचित्र समाजमाध्यम तसेच इतर ठिकाणी प्रसिद्ध केले असून त्याच्या मात्या-पित्यांना शोधून देण्याचे आवाहन केले आहे.