‘वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मुलाची दहा कोटींची बाइक’ अशा नावाने गेल्या काही दिवसांपासून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ तसेच अन्य समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या छायाचित्रातील दुचाकी त्यांची नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुचाकीचे मालक वसईमधील उद्योजक केनेथ डिसोझा आहेत. विशेष म्हणजे, या बाइकची किंमत दहा कोटी नसून ३० लाख रुपये आहे. परंतु, तिची नोंदणी करण्यासाठी डिसोझा यांना तब्बल साडेचार लाख भरावे लागले.
गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप आणि सोशल मीडियावर ‘इंडियन’ नाव असलेल्या या मोटारसायकलीचे छायाचित्र प्रसारित झाले होते. त्यामध्ये ही दुचाकी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आणि सिनेनिर्माते उत्तुंग ठाकूर यांनी दहा कोटी रुपयांना विकत घेतल्याचे म्हटले जात होते. सामान्य दुचाकींच्या तुलनेत भव्य दिसणारी ही आकर्षक दुचाकी, त्याची किंमत आणि त्याचे मालक यांमुळे अनेकांचे कुतूहल चाळवले गेले होते. मात्र ठाकूर कुटुंबीयांनी यापूर्वीच याचा इन्कार केला होता. त्यानंतर या गाडीच्या खऱ्या मालकाचा शोध घेतला असता ही दुचाकी प्रख्यात निकोलस इंजिन्स मोटर्सचे संचालक केनेथ डिसोजा यांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मला गाडय़ांचा छंद असून आतापर्यंत अनेक देशविदेशातल्या गाडय़ा मी वापरल्या आहेत. ही गाडीही अमेरिकेहून मागवली. मात्र, तिची किंमत दहा कोटी नसून ३० लाख रुपये आहे,’ असे ते म्हणाले.
या गाडीचे इंजिन १८०० सीसीचे असून त्याचे वजन ३५४ किलो एवढे आहे. ही गाडी जानेवारी महिन्यात बाजारात दाखल झाली. मात्र, डिसोजा यांनी तिची नोंदणी नोव्हेंबर महिन्यातच केलीे होती. त्यानुसार ४ जानेवारीला ती भारतात आली. विरार परिवहन कार्यालयात ती पूर्वनोंदणीसाठी आली होती. पुन्हा ती डीलरकडे गेली असून दोन दिवसांनी ती आपल्या ताब्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोण आहेत केनेथ डिसोजा?
केनेथ डिसोजा हे प्रख्यात निकोलस इंजिन्स कंपनीचे संचालक आहेत. वाहनाचे इंजिन तयार करण्याचा त्यांचा कारखाना आहे. केनेथ यांना महागडय़ा गाडय़ांचा छंद आहे. त्यांच्याकडे पोश्र्च, बीटी, हार्ले डेव्हिस अशा पंधराहून अधिक गाडय़ा आहेत.