शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकाच फ्रिजमध्ये साठवून ठेवणे, अतिरिक्त जागेत मद्य विक्री करणे, सिगारेट ओढण्यासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती न करणे यासारखे नियम मोडणाऱ्या ठाणे आणि आसपासच्या १४ हॉटेल व्यवस्थापनांना अन्न व औषध प्रशासनाने नोटिसा बजाविल्या आहेत. येत्या १५ दिवसांत सुधारणा करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पावसाळा तोंडावर आल्याने अन्नातून विषबाधेसारख्या घटना घडतात. या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाने शहरातील हॉटेलांची तपासणी सुरू केली आहे. या वेळी शहरातील १४ हॉटेलांमध्ये कायद्याचा भंग केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पुढील १५ दिवसांत त्रुटी सुधाराव्यात, त्यानंतरही या त्रुटी कायम राहिल्यास संबंधित हॉटेलांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, असा इशारा दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अन्नातून विषबाधेच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने ठाणे शहरातील बडय़ा हॉटेल आणि रेस्टॉरंटची तपासणी सुरू केली आहे. पाहणीच्या पहिल्या टप्प्यात शहरातील १० हॉटेलांची तपासणी करून त्यांना नोटीस बजावल्यानंतर शुक्रवारी पुन्हा १४ नामांकित हॉटेलांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान पथकाला या आस्थापनांमध्ये वेगवेगळ्या आठहून अधिक त्रुटी आढळल्या. तपासणीआधारे त्या सुधारण्याची नोटीस प्रशासनाकडून बजावण्यात आली आहे. या त्रुटी पुढील १५ दिवसांत पूर्ण करून त्याची पूर्तता केल्याचा लेखी अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याची खातरजमा करण्यासाठी पुन्हा फेरतपासणी करण्यात येईल. त्यामध्ये त्रुटीची पूर्तता झाली नसल्याचे आढळल्यास संबंधित उपाहारगृहाचे परवाने रद्द करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हॉटेल्स..
मंत्रा (पार्क) रेस्टॉरंट, अमित गार्डन रेस्टॉरंट, हॉटेल मयूरी रेस्टॉरंट, सुपर कॅटर्स, हॉटेल गुलमोहर, द. ब्ल्यू. रूफ क्लब रेस्टॉरंट, समुद्रा रेस्टॉरंट, हॉटेल चुल्हा, अजिन पंजाब, हॉटेल शुभम अनेक्स, हॉटेल जलाजा हेरिटेड, हॉटेल अॅनक्स, अॅम्बोसिया हॉटेल, हॉटेल मयूर यांची तपासणी करण्यात आली.
आढळलेल्या त्रुटी..
अन्न परवान्याची सत्य प्रत हॉटेलच्या दर्शनी नसणे, हॉटेलमधील प्रक्रियांवर लक्ष ठेवण्यासाठी तांत्रिक व्यक्ती उपलब्ध नसणे, हॉटेलमधील टाकाऊ अन्नपदार्थ टाकण्यासाठी झाकण असलेल्या केराच्या टोपलीचा वापर केला जात नसणे, अशासारख्या त्रुटी आढळून आल्या आहेत. तर परमिट रूम व बारमध्ये अतिरिक्त जागेत मद्यविक्री करणे, सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष नसणे, शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थ एकाच फ्रिजमध्ये ठेवणे, तसेच अन्नपदार्थ हाताळणाऱ्या कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची सूचना न देणे, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यास योग्य आहे का याची तपासणी न करणे, अशा त्रुटी आढळून आल्या आहेत.