अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीम आखणार
कल्याण, डोंबिवली ते ठाणे आणि नवी मुंबई हा प्रवास वाहतूक कोंडीमुक्त व्हावा यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने शीळ फाटा जंक्शन येथे आखलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. या कामात येणारे अतिक्रमणाचे अडथळे दूर करण्यात येतील, अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने बुधवारी दिली. तसेच या प्रकल्पातील अडथळे तसेच रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असलेले विकास आराखडय़ातील फेरबदल तातडीने हाती घेतले जातील, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
कल्याण-शीळ मार्गावर गेल्या काही वर्षांपासून बडय़ा विकासकांचे मोठे प्रकल्प उभे राहात आहेत. या संपूर्ण पट्टय़ातील वाहतुकीचा प्रमुख मार्ग शीळ फाटा हा आहे. तसेच उरणच्या जवाहरलाल नेहरू बंदरातून येणारी वाहने तळोजा-शीळमार्गे मुंब्रा वळण रस्त्यावरून मुंबई-नाशिक महामार्गाकडे कूच करत असतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक दुपटीने वाढली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंब्रा वळण रस्ता ते शीळ फाटा जंक्शन आणि कल्याण फाटा जंक्शन या मार्गावर दोन उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आणला आहे. मात्र या मार्गावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आल्याने रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे उड्डाणपूल उभारण्यापूर्वी ही अतिक्रमणे हटवणे आवश्यक आहे. हे प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले. हा उड्डाणपूल चौपदरी असणार असून बाजूचे ३० मीटरचे रस्ते ६० मीटर करण्यात येणार आहेत.