वसई-विरारमध्ये विविध ‘नाताळ अंक’ प्रकाशनाच्या वाटेवर

दिवाळीमध्ये दिवाळी अंकांच्या रूपाने वाचकांना साहित्यिक फराळ मिळतो. वसई-विरारमध्ये हीच संकल्पना नाताळनिमित्त राबवली जाते. नाताळात वाचकांना खुसखुशीत आणि वाचनीय साहित्य मिळावे यासाठी बाजारात विविध ‘नाताळ अंक’ दाखल होत आहेत. या अंकातून वाचकांना अनेक लेख, कविता, ललित लेख, कथा, प्रवास वर्णन, व्यक्ती परिचय अशा प्रकारची साहित्यिक मेजवानी मिळणार आहे.

नाताळच्या काळात अनेक ‘नाताळ अंकां’ची वाचकांना प्रतीक्षा असते. यंदा ‘सुवार्ता’, ‘गीत’, ‘निर्भय’ हे नाताळ अंक बाजारात आले असून अनेक अंक प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. वसई ख्रिस्ती धर्मप्रांतातर्फे प्रसिद्ध होणारे ‘सुवार्ता’ हे मासिक नाताळसाठी विशेषांक प्रसिद्ध करते. या अंकात ‘येशू जन्माला आला नसता तर’ हा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस यांचा लेख असून पु. द. कोडोलीकर, हरी नरके आदी साहित्यिकांचे लेख आहेत. मनवेल तुस्कानो यांच्या ‘निर्भय’ या अंकात यंदा तुस्कानो यांच्यासोबत फादर व्हिन्सी डिमेलो, रेमंड मचाडो आणि जेम्स परेरा यांचे लेख आहेत.

वसईतील प्रकाशक लेस्ली डायस यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘गीत’ हा नाताळ विशेषांक प्रकाशित केला आहे. या अंकामध्ये वाचकांना २० लघुकथांसह २१ ललित लेख, १५ विविध विषयांवर लेख, निवडक मुलाखती तसेच मायकल फुटर्य़ाडो, भाऊसाहेब वर्तक, स्टॅन्ली घोन्साल्विस यांसह विविध व्यक्तींचे लेख वाचता येणार आहे.

बोलीभाषेतील अंक

उत्तर वसईतील तरुण साहित्यिकांनी संपूर्णपणे सामवेदी बोलीभाषेत लिहिलेला ‘कादोडी’ नावाचा आगळावेगळा अंक प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ‘सामवेदी बोलीभाषेत आतापर्यंत लिखाण झालेले नाही, तसेच इतर भाषेचा वापर वाढल्याने नव्या पिढीचा बोलीभाषेकडे ओढा कमी झालेला आहे. बोलीभाषा टिकली पाहिजे, म्हणून आम्ही कादोडी अंक प्रकाशित करत आहोत, असे ख्रिस्तोफर रिबेलो यांनी सांगितले. रिबेलो यांचा ‘ख्रिस्तायन’ नावाचा ऑनलाइन नाताळ विशेषांकही आहे. वसईतील पहिला आणि एकमेव ऑनलाइन नाताळ अंक आहे.

सुवार्ता हा वसईतील जुना ‘नाताळ अंक’ आहे. राज्यात आणि मराठी भाषकांमध्ये ‘नाताळ अंक’ प्रकाशित करण्याची चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

फादर कोरिया, संपादक

ज्यांना लिहायची संधी मिळत नाही अशा लोकांना लिहिण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही ‘नाताळ अंक’ काढत आहोत. महाराष्ट्रातून १००हून अधिक लेखक या अंकामध्ये लिहीत आहेत. वाचकांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे यासाठी आमचा प्रयत्न असतो.

लेस्ली डायस, प्रकाशक