भाईंदर : सध्या राज्यात टाळेबंदी नियम लागू असल्यामुळे अत्यावश्यक कामांना पूर्ण करण्याकरिता प्रशासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. परंतु अशा परिस्थितीत मीरा-भाईंदर शहरात मोबाइल मनोऱ्यांचीही उभारणी करण्यात येत असल्यामुळे सामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.
करोनाचे संकट डोक्यावर आल्यामुळे अत्यंत महत्त्वाची कामे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद अवस्थेत पडून आहेत. अशा परिस्थितीत मीरा-भाईंदर शहरात लपूनछपून चक्क मोबाइल मनोरे उभारत असल्याचे आढळून आले आहे. यात कायद्याच्या नियमाचे पालन केले जात नसून अनेक कामे अवैध पद्धतीने केली जात आहेत. शहरात ५४४ मोबाइल मनोरे असून यांपैकी फक्त १७८ मोबाइल मनोऱ्यांनी परवानगी, अटी-शर्तीची पूर्तता केलेली आहे. आतापर्यंत ३६६ मोबाइल मनोरे शहरात अनधिकृतपणे उभे राहिले आहेत. आता त्यात अजून भर पडत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर कारवाई
मीरा रोड येथील परिसरात मोबाइल मनोऱ्यांच्या उभारणीची कामे सुरू असल्यामुळे स्थानिक नागरिकांकडून आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रभाग अधिकारी गोडसे यांनी जागेवर धाव घेऊन त्वरित कामे थांबवून कारवाई केली. त्याच प्रमाणे अशा प्रकारच्या कामांना सध्या तरी कोणतीच परवानगी देण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गृहसंकुलांची निष्काळजी
गृहसंकुलांच्या निष्काळजीपणामुळे अनधिकृत मनोऱ्यांची उभारणी करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. अनेक इमारतींमधील रहिवासी मनोऱ्याच्या मोबदल्यात अधिक पैसे मिळत असल्यामुळे आपल्या इमारतीवरही मनोरे उभे करत आहेत.
आमच्या परिसरात काम करण्यात येत असल्यामुळे मी आयुक्त साहेबांकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्यांना पाठवून त्यावर कारवाई केली.
– मोईन सय्यद,स्थानिक रहिवासी