ठाणे महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्चुन उभ्या केलेल्या रहेजा वसाहतीजवळील तरण तलाव संकुलातील ठेकेदार ठाणेकरांची कशी लूट करत आहे , याचे सविस्तर वृत्त गेल्या आठवडय़ात लोकसत्ताने प्रसिद्ध करताच येथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. ‘ठाणे क्लब’ या नावाने सुरू झालेल्या नव्या व्यवस्थापनाने या संकुलाचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात महापालिकेचे नियम, कायदे, करार धाब्यावर बसविल्याचे प्रथमदर्शनी तरी उघड होत आहे.
ठाणेकरांना अत्याधुनिक असा तरण तलाव उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने तब्बल दहा वर्षांपूर्वी उभारलेला ‘ठाणे क्लब’ पुढे ठेकेदारास २५ वर्षांच्या करारावर वापरा आणि हस्तांतरित करा (ओटी) या तत्त्वावर चालविण्यासाठी देण्यात आला. मात्र, यासाठी ठेकेदारास वर्षभरासाठी आकारण्यात आलेले जेमतेम १२-१३ लाख रुपयांचे भाडे पाहता हा सगळा आतबट्टय़ाचा व्यवहार असल्याचे केव्हाच स्पष्ट होऊ लागले आहे. एरवी मालमत्ता कराचे दोन-तीन हजार रुपये थकविणाऱ्या सर्वसामान्य ठाणेकरांना नोटिसांवर नोटिसा धाडणाऱ्या प्रशासनाने या संकुलाच्या ठेकेदाराने काही कोटींच्या घरात कर थकवूनही काल-परवापर्यंत बघ्याची भूमिका घेतली होती. ठाणेकरांच्या हिताचा आव आणत इतकी वर्षे भावनेच्या राजकारणावर स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवणारी सत्ताधारी शिवसेना याविषयी मूग गिळून गप्प बसल्याने याविषयी संशयाचे धुके अधिकच गडद बनले आहे. परंतु, क्रीडा संकुलांच्या नावे ठाणेकरांची होणारी ही काही पहिलीच फसवणूक नव्हे.
ठाणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक तसेच बडय़ा पदाधिकाऱ्यांपुरताच वापर असणाऱ्या कोरम मॉलजवळील शहिद हेमंत करकरे क्रीडा संकुलात सर्वसामान्य ठाणेकरांना प्रवेश दिला जाईल, हे प्रशासन आणि ठाण्यातील बडय़ा नेत्यांचे आश्वासन अशीच फुकाची बडबड ठरल्याचे ठाणेकरांनी अनुभवले आहे. कळव्यात यशवंत रामा साळवी यांच्या नावाने सुरू असलेल्या तरण तलावात शेवाळ्याचे थर साचतात आणि हे संकुल तेथे पोहोचण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांसाठी अखेर बंद करावे लागते, यावरून महापालिकेची मानसिकता काय आहे हे लक्षात येते. घोडबंदर भागात ढोकाळी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाने उभारण्यात आलेले क्रीडा संकुल नेमके कुणी चालवायचे यावरूनही गेले वर्षभर वाद सुरू आहे. ‘ठाणे क्लब’प्रमाणे या संकुलाचा ठेका आपल्याला मिळावा यासाठी काही राजकीय नेत्यांनी देवाचा धावा सुरू केला आहे, हे उघड गुपित आहे. कळव्यातील तरण तलावात शेवाळे साचवून आम्ही ही व्यवस्था पाहण्यास कसे अकार्यक्षम आहोत, असाच संदेश महापालिकेतील अधिकाऱ्यांना कदाचित द्यायचा असावा. काही दिवसांनी हे संपूर्ण संकुलच ठाणे क्लबप्रमाणे एखाद्या ठेकेदाराच्या घशात घातले गेल्यास आश्चर्य वाटायला नको.
ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये ठाणेकरांसाठी बॅटिमटन, क्रिकेट, बुद्धिबळ, कॅरम अशा वेगवेगळ्या खेळांसाठी व्यवस्था आहे. मात्र, महापालिका हद्दीचा वाढता आवाका लक्षात घेता ही व्यवस्था अपुरी ठरू लागल्याने शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये लहान क्रीडा संकुलांची उभारणी करण्याचे ठरविण्यात आले. तीनहात नाका परिसरातील जॉन्सन कंपनीच्या सुविधा भूखंडावर उभारण्यात आलेले तरण तलाव संकुल हा याच धोरणाचा भाग आहे. असाच प्रयत्न कोरम मॉलच्या उभारणीनंतर महापालिकेच्या हाती आलेल्या सुविधा भूखंडांच्या माध्यमातून करण्यात आला. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावाने या ठिकाणी एका खासगी विकासकाच्या माध्यमातून बॅटिमटन; तसेच लॉन टेनिस कोर्ट उभारण्यात आले असून रहिवाशांना फेरफटका मारण्यासाठी याच भागात उद्यानाची उभारणीही करण्यात आली आहे. ठाण्याचे महापौर, उपमहापौरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खुले असणाऱ्या या संकुलात इतर वेळी सर्वसामान्य ठाणेकरांनाही प्रवेश दिला जावा, असा प्रस्ताव ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ िशदे यांनी तब्बल तीन वर्षांपूर्वी मांडला होता. असे असताना या प्रकल्पाचा शुभारंभ होऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप तसे झालेले नाही आणि एकनाथ िशदे आणि शिवसेनेच्या महापालिकेतील नगरसेवकांना त्याविषयी काही पडलेले नाही, असेच दिसते. हे संकुल उभे राहिले आणि सुरू करण्याची घटिका समीप आली तेव्हा ठाण्यातील एका प्रतापी आमदाराने स्वत:च्या संस्थेकडे या संकुलाचे व्यवस्थापन कसे राहील , यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालविले होते. पूर्व द्रुतगती महामार्गास लागूनच असलेल्या कोरमसारख्या मोठय़ा मॉललगत असलेले हे बॅटिमटन आणि लॉन टेनिस कोर्ट म्हणजे बक्कळ कमाईची संधी, हे कदाचित या प्रतापी आमदाराने हेरले असावे.  मात्र, त्या वेळी पालिकेत आयुक्त असलेले आर. ए. राजीव यांनी हा डाव अगदी कुशलपणे हाणून पाडला. हे संकुल चालविण्याची आर्थिक क्षमता महापालिकेत आहे. त्यामुळे कोणत्याही संस्थेस ते चालविण्यास देऊ नये, अशा स्वरूपाचा ठराव राजीव यांनी मंजूर करून घेतला. खरेतर राजीव यांची ही भूमिका तेव्हा अनेकांना मान्य नव्हती. मात्र, प्रतापी आमदाराचा डाव हाणून पाडण्याकरिता पक्षातील अनेकांसाठी ती आयती संधी होती. विरोधकांनाही या आमदाराला धडा शिकवायचा होता. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असे सगळे एकवटले आणि राजीव यांच्या मागे उभे राहिले. लोकप्रतिनिधींमधील राजकीय विसंवाद हेरून महापालिकेच्या हिताचे ठराव मंजूर करून घेण्यात राजीव पटाईत होते. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावाने सुरू होणारे लॉन टेनिस संकुल प्रतापी आमदाराच्या घशात जाणार नाही, अशी व्यवस्था राजीव यांनी करून ठेवली. त्यांनी जे केले ते ठाणेकरांच्या निश्चितच हिताचे होते.
ठाणेकरांना दर्शन दुर्लभच
संकुलाच्या ठिकाणी अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक आणि बडय़ा पदाधिकाऱ्यांना प्रवेश असेल, असा ठराव मंजूर झाला. शहीद हेमंत करकरे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या या संकुलात शहीद तुकाराम ओंबळे यांच्या नावाने बॅटमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. याशिवाय लॉन टेनिस कोर्ट आणि अद्ययावत असा असा जॉगिंग ट्रॅक हे या संकुलाचे वैशिष्टय़ आहे. असे आधुनिक क्रीडा संकुल ठाणे महापालिकेच्या मालकीचे असणे भूषणावह असले तरी तेथे ठाणेकरांना प्रवेश का नाही, असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडला होता. या संकुलाचा शुभारंभ करताना एकनाथ िशदे यांनी नेमका हाच मुद्दा हेरला. शिवसेनेला ठाणेकरांची नस चांगली ठाऊक आहे. महापालिका निवडणुका तोंडावर असताना या संकुलाचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे िशदे यांनी आक्रमक भूमिका घेत हे क्रीडा संकुल सर्वसामान्य ठाणेकरांसाठी खुले व्हायलाच हवे, असे म्हणणे मांडले. संकुलाचा शुभारंभ होऊन साडेतीन वर्षे लोटूनही संकुलाचे दरवाजे ठाणेकरांसाठी बंदच आहेत. अधिकारी आणि नगरसेवकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले हे संकुल ठाणेकरांसाठी खुले कशासाठी करायचे, असा सवाल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित करत आहेत. तरीही सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत लॉन टेनिस कोर्ट ठाण्यातील खेळाडूंसाठी खुले करण्याचा प्रस्ताव पुढे आणण्यात आला. ‘ठाणे क्लब’ २५ वर्षांसाठी ठेकेदाराकडे सोपवून सत्ताधारी शिवसेना मोकळी झालेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे केव्हाच ठेकेदारांचे ठाणे झालेय, याचे हे ठसठशीत उदाहरण ठरावे.
जयेश सामंत