करोनाचे निर्बंध पायदळी; सामाजिक अंतर, मुखपट्ट्यांकडे दुर्लक्ष
वसई : राज्यासह वसई-विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. यामुळे प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही शहरात क्रिकेटचे सामने, लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम एकदम धूमधडाक्यात सुरू आहेत. दुसरीकडे बाजारपेठांतही मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळू लागली आहे.
वसई-विरार शहरात मागील पंधरा दिवसांपासून करोनाचा आलेख वाढू लागला असून करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे पालिका प्रशासनाने यावर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याआधीच यात्रा, उत्सव यावर बंदी घातली आहे. तर करोनाचा वाढता जोर पाहता शहरातील शाळा महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. उपाहारगृहात ५० टक्के क्षमतेने ग्राहक बसविण्यास सांगण्यात आले आहे. तर लग्नसोहळा साजरा करण्यासाठी फक्त ५० जणांची परवानगी देण्यात आली आहे.
ही सर्व नियमावली लागू केली असतानाही वसई-विरार शहरातील विविध ठिकाणी लग्नसोहळ्याचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. मंगल कार्यालय या ठिकाणी जरी कमी माणसे एकत्र येऊन सोहळे साजरे होत असले तरी इतर ठिकाणच्या भागात शेकडो माणसे एकत्रित येऊन कार्यक्रम साजरे होऊ लागले आहेत. यामध्ये ‘ना करोना नियमांचे पालन , ना मुखपट्टी’ यामुळे करोना संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे. तर दुसरीकडे क्रिकेटच्या सामन्यांचेही विविध ठिकाणच्या भागात मोठ्या प्रमाणात आयोजन होऊ लागले आहे. त्या ठिकाणीही खेळाडू , प्रेक्षक वर्ग यांची मोठी गर्दी जमू लागली आहे. यामुळे विविध भागांतील नागरिक एकमेकांच्या संपर्कात येऊन करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.
१७ दिवसांत ६५० करोनाबाधित
वसईत मागील १७ दिवसांत ६५० करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे रुग्ण वाढ होण्याचा आलेख झपाट्याने वाढला आहे. याच पाश्र्वाभूमीवर आठवडे बाजार बंद केले. परंतु सार्वजनिक ठिकाणी , स्टेशन परिसरात मोठ्या संख्येने फेरीवाले विक्री करण्यासाठी बसत असून त्या ठिकाणीही गर्दी वाढली आहे.
लग्न समारंभावर निर्बंध आणण्यासाठी गुरुवारी ‘परिमंडळ २’ मधील लग्न समारंभाच्या सभागृह आणि हॉटेल चालकांची बैठक आयोजित कºण्यात आली होती. या बैठकीत शासकीय निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती उपायुक्त प्रशांत वाघुंडे यांनी दिली. ज्या ठिकाणी कुठेही नियमांचे उल्लंघन करून लग्न सोहळे, क्रिकेटचे सामने आयोजित केले जात असतील तर त्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी याबाबत सक्त कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना असे कार्यक्रम टाळले पाहिजे असे आवाहन केले आहे.
लग्न समारंभात जर मर्यादित संख्येपेक्षा जास्त लोक असतील तर सभागृहाच्या मालकासह आयोजकांवर आणि पाहुण्यांवर देखील गुन्हे दाखल केले जातील. – प्रशांत वाधुंडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ २ पोलीस आयुक्तालय
शहरात अनेक ठिकाणी क्रिकेटचे सामने आणि समारंभ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – गंगाथरन डी., आयुक्त, वसई-विरार महापालिका
