महिलेची फसवणूक
ठाणे : राबोडी भागात एका महिलेला पेटीएम खाते अपडेट करण्याचे सांगून तिची ६० हजार रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी या महिलेशी मोबाइलवर संपर्क साधून पेटीएम खात्याची तपासणी तसेच खाते अपडेट करण्याची सूचना एका महिलेने दिली. त्यानंतर, त्यांना १० रुपयांचा व्यवहार करण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने व्यवहार केला असता, त्यांच्या खात्यामधील ६० हजार रुपये बेपत्ता झाले.
पोलिसांना मारहाण
ठाणे : डोंबिवली येथील मानपाडा भागात तीन जणांनी पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई परमेश्वर तिडके आणि चौरे हे मानपाडा येथे गस्त घालत होते. रुक्मिणी हॉटेलजवळ प्रशांत पाटील, जालिंदर कुंभार व अमोल अडसुळे हे हॉटेलच्या व्यवस्थापकासोबत वाद घालत असल्याचे पोलिसांना दिसले. तिडके व चौरे त्या ठिकाणी घडलेल्या प्रकाराबाबत विचारण्यासाठी गेले असता प्रशांतने तिडके यांना मारहाण केली, तर चौरे यांना अमोल आणि जालिंदर याने धक्काबुक्की केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.