सायप्रस उद्यान महालक्ष्मी तलाव, रेल्वे स्थानकाशेजारी, बदलापूर (पश्चिम)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निसर्गश्रीमंत बदलापूर शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके तलाव आहेत. ते सर्व तलाव निवांत जागी आहेत. अपवाद फक्त रेल्वे स्थानकाशेजारच्या महालक्ष्मी तलावाचा. पश्चिमेतील स्थानकाशेजारी असूनही आजूबाजूच्या गोंगाटाचा इथे लवलेश नसतो. छोटेखानी उद्यान असलेल्या या तलाव आणि आसपासच्या परिसराच्या दुरुस्तीची गरज आहे.

झपाटय़ाने नागरीकरण झाले असले तरी बदलापूरमधील हिरवाई अद्याप कायम आहे. त्यात शहरातील विविध प्रभागात असलेली छोटी मोठी उद्याने शहराच्या निसर्ग श्रीमंतीत भर घालतात. त्यात तलावांचाही मोठा वाटा आहे. शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके तलाव असले तरी त्यामुळे शहर सौंदर्यात भर पडली आहे. सध्या या तलावांची डागडुजी आणि स्वच्छता राखण्याची आवश्यकता आहे. त्यातीलच एक तलाव म्हणजे रेल्वे स्थानकाशेजारी पश्चिमेला असलेला महालक्ष्मी तलाव. बस स्थानक, रेल्वे स्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी असूनही हा तलाव सहसा दृष्टीस पडत नाही. रेल्वेतून प्रवास करत असताना किंवा उड्डाणपुलावरून जात असताना अनेकदा याचे दर्शन होते. तलावाशेजारी असलेल्या देवीच्या मंदिरामुळे याला महालक्ष्मी नाव पडल्याचे अनेक जण सांगतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यावर इथे कुणी फारसे लक्ष दिल्याचे जाणवत नाही. जवळपास वीस गुंठे क्षेत्रफळाचा असलेला हा तलाव अनेकांना पहाटे सकारात्मक ऊर्जा देतो. स्थानकाच्या शेजारी असूनही येथे कमालीची शांतता अनुभवता येते. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण येथे पहाटे फिरण्यासाठी येत असतात. तलावाच्या शेजारीच असलेल्या छोटेखानी उद्यानामुळे या तलावाची शोभा वाढते. मात्र या उद्यानाचीही देखभाल नियमितपणे व्हावी, अशी मागणी येथे येणारे अनेक जण करतात. तलावाचे प्रवेशद्वार हाच अनेकांसाठी अडचणीचा भाग आहे. पूर्व पश्चिम भागाला जोडणाऱ्या रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गावरून जाताना या तलावाचे प्रवेशद्वार लागते. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही येथे जाणे टाळतात. तलावाच्या आसपास काही प्रमाणात झाडे आहेत. मात्र त्यांची संख्या वाढल्यास तलावाची शोभा वाढेल, असे अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात. पहाटे प्रसन्न वातावरणात इथे अनेक जण व्यायाम, योगसाधना करताना दिसतात. मात्र त्यासाठी विशेष सुविधा पालिका प्रशासनातर्फे करण्यात आली नसल्याने येथे येणारे खंत व्यक्त करतात. अनेकदा येथे आसपासच्या भागातून सुरक्षा भिंतीजवळ कचरा टाकण्यात येतो. त्यामुळे येथे येणाऱ्या जाणाऱ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. तलावाच्या भोवती अनेक जण फिरताना दिसतात. मात्र गेल्या काही वर्षांत तलावाच्या सुरक्षा जाळ्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. तलावाच्या चारही बाजूंना लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक जमीन खचल्याने खड्डय़ात गेले आहेत. त्यामुळे पहाटे फिरत असताना येथे अपघात होण्याची शक्यताही वाढली आहे. याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिक करतात. महालक्ष्मी तलाव हा पाझर तलाव असून तो बारमाही भरलेला असतो. मात्र मार्च, एप्रिलनंतर पाणी आटू लागल्याने येथे अनेकदा दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे तलावाची स्वच्छता करण्याची गरज अनेक जण व्यक्त करतात. तलावाच्या आतल्या बाजूने अनेक ठिकाणी भगदाड पडले असून त्यामुळे तलावाची सुरक्षितता धोक्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cypress park in badlapur west
First published on: 21-11-2017 at 02:48 IST