जलपातळी खालावल्याने विहिरी आणि बोअरवेलचेही पाणी खारट

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना सध्या तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. विहिरी आणि बोअरवेलमध्ये उपलब्ध पाण्याची पातळी खालावल्याने पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढले आहे. हे क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

वसई तालुक्याच्या पूर्व भागातील चंद्रपाडा, टोकरे, डोलीव, खार्डी, टीवरी, मालजीपाडा, बापाणे, जूचंद्र, चिंचोटी, कामण, देवदळ, कोल्ही, ससुनवघर इत्यादी गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हामुळे विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे पाण्यातील क्षारता वाढून ते खारट झाले आहे. नैसर्गिक स्रोत आटल्याने महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. येथील आदिवासी पाण्यासाठी नदीत खड्डे पाडून त्यातील दूषित पाण्याचा वापर करत आहेत. हे दूषित पाणी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कामण, चिंचोटी, देवदळ इत्यादी भागात पालिकेतर्फे दररोज ३ टँकर पुरवले जातात. एकटय़ा कामण गावाची लोकसंख्या १५ हजारांपेक्षा जास्त असल्याने या पाण्याचे वाटप अपुरे होते. येथील आदिवासींना विकतच्या पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागते ज्याचा खर्च त्यांना परवडत नाही. टँकर लॉबीकडून

या आदिवासींकडून अवाचे सव्वा पैसे वसूल केले जात आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर आंदोलनाचा इशारा या आदिवासींनी दिला आहे.

पालिकेकडून फक्त आश्वासने

वसई पूर्वेकडे जानेवारी महिन्यापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली होती. म्हणून आपल्या हक्काचे पाणी मिळावे याकरिता ८ मार्च रोजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली येथील नागरिकांनी पालिका मुख्यालय येथे आंदोलन केले. या वेळी पालिकेतर्फे त्यांना २ महिन्यांमध्ये पाणी मिळणार व यासाठी तातडीने या ठिकाणी सर्वे करण्यात येणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले होते. पण पालिकेने दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत.