डॉ. अर्चना गोडबोले यांचे प्रतिपादन
शहरी भागातील मंडळी दोन झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न केल्याचे समाधान मिळवत असले तरी ग्रामीण भागामधील गावकऱ्यांना या गप्पांचा उपयोग नसतो. त्यामुळे खाजगी जंगले वाचवण्यासाठी या गावकऱ्यांचा सहभाग महत्वाचा असतो. हेच लक्षात घेऊन कोकणातील पर्यावरणासाठी काम करणाऱ्या डॉ. अर्चना गोडबोले यांच्या संस्थेने ‘खाजगी जंगले राखा आणि पैसे मिळवा’ हा उपक्रम सुरू केला. त्यामुळे लोकसहभागातून जंगले वाचवणे शक्य असल्याचे मत डॉ. अर्चना गोडबोले यांनी व्यक्त केले.
फर्न संस्थेच्या वतीने आयोजित पर्यावरण व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवशी डॉ. अर्चना गोडबोले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोडबोले यांनी आपला प्रवास उपस्थितांसमोर मांडला. पश्चिम घाटातील उत्तर पश्चिम घाटाचा बराचसा भाग महाराष्ट्रात आहे. अनेक दुर्मिळ वनस्पती, प्राणी, कीटक यांचा ही अधिवास जगरहाटीच्या रेटय़ात नष्ट होत आहे. त्याच्या संरक्षण व संवर्धनासाठी चार भिंतीत केलेले संशोधन आणि त्यावर आधारित प्रबंध प्रसिद्ध करून परिस्थिती बदलणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे गोडबोले यांनी सरकारी नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ देवरायांसाठी काम करायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी समविचारी मित्रांबरोबर ‘अॅप्लाईड इन्व्हॉरमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन केली.
त्यांनी २० वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्य़ातील संगमेश्वर तालुक्यातील देवारायांपासून कामाला सुरूवात केली. भारावलेले तरुण वय असल्याने गावकऱ्याना त्याचे गांभीर्य लगेच लक्षात आले नाही. मात्र सतत प्रयत्नांनंतर देवराईतील झाडे पुन्हा वाढू लागली. आसपासच्या विहिरीतून पाण्याची पातळी वाढली. त्यानंतर गावकऱ्यांनी विश्वास दाखवण्यास सुरूवात केली. जिथे सरकार काम करत नाही तिथे गोडबोले यांची संस्था काम करते. गेल्या २० वर्षांच्या अथक परिश्रमांनी हळूहळू या भागाचा कायापालट होत आहे. ‘सिव्हिल सोसायटी ऑफ इंडिया’ तर्फे पायाभूत स्तरावर काम करणाऱ्यांसाठी दिला जाणारा ‘हॉल ऑफ फेम’ हा पुरस्कार त्यांच्या संस्थेला मिळाला आहे. अशी माहिती अर्चना गोडबोले यांनी दिली.
पर्यावरणास हानी न पोहचवता बेहेडा चूर्ण..
देवारायांमध्ये बेहेडय़ाचे प्रचंड वृक्ष असून बेहेडा गोळा करण्याचे काम अनेक गावकरी करत असत पण त्यातून फारसा पैसा मिळत नसे. अर्चना गोडबोले यांच्या संस्थेने ‘फेअरवाईड फाऊंडेशन’ या संस्थेच्या मदतीने या झाडांना प्रमाणित केले आणि बेहेडा चूर्ण पुरवण्यासाठी पक्का हर्ब्स या इंग्लंड मधील कंपनीशी करार केला. यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळू लागला आहे.
