काटई-कर्जत रस्त्याला खड्डय़ांमुळे ग्रहण ; सांडपाणी, कचऱ्यामुळे रस्त्याची दुर्दशा, वाहतुकीत अडथळे

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो.

अंबरनाथ: कर्जतपासून बदलापूर, अंबरनाथ आणि थेट डोंबिवली आणि आसपासच्या शहरांतील वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या काटई नाका ते कर्जत रस्त्याचा काही भाग काँक्रीटचा झाला असला तरी बहुतांश  भागांवर खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत असताना या रस्त्याला शेजारच्या बैठय़ा चाळीतीळ सांडपाणी आणि कचऱ्याचे ग्रहण लागले आहे. याच नागरी सांडपाण्यामुळे रस्त्याला खड्डे पडत असल्याचे समोर आले आहे. 

गेल्या काही वर्षांत काटई नाक्यापासून ते थेट बदलापूपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उद्योग, कंपन्या, नामांकित गृह प्रकल्प, हॉटेल आणि विविध व्यावसायिक संस्था उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे. परिणामी रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचा काटई ते खोणी हा भाग काँक्रिटचा करण्यात आला. त्यामुळे या भागातील वाहतूक वेगवान झाली आहे. त्याचा वाहनचालकांना फायदाही होतो आहे. त्याच वेळी खोणीपासून पुढे बदलापूपर्यंत विविध भागांत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. खोणी फाटा ते नेवाळी नाका या भागात रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तर काटई नाका ते थेट नेवाळी आणि पुढे उल्हासनगर शहराच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे रस्त्याचे विद्रूपीकरण झाले आहे. यावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातो. या प्रयत्नांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभ्या राहिलेल्या बैठय़ा चाळी आणि रस्त्यांचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे. काटई ते नेवाळी या भागात कर्जत राज्यमार्गावर मोठय़ा प्रमाणावर बैठय़ा चाळी उभ्या राहिल्या आहेत. या बैठय़ा चाळीमध्ये सांडपाण्याची विशेष व्यवस्था नाही. परिणामी या चाळींचे लाखो लिटर सांडपाणी दररोज काटई कर्जत रस्त्यावर येते. परिणामी पाणी साचून रस्त्याला खड्डे पडत आहेत. रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर अवघ्या काही दिवसांत साचत असलेल्या पाण्यामुळे पुन्हा खड्डे पडतात. त्यामुळे रस्ता सुरळीत करण्यात एमआयडीसी प्रशासनाला अपयश येते आहे. एकीकडे नागरी सांडपाण्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत असतानाच दुसरीकडे उर्वरित रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drivers face trouble due to potholes on katai karjat road zws

Next Story
भूसंपादन अपहारात निवृत्त कर्मचारी? ; एक निवृत्त कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात, ३० हून अधिक जणांना अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी