शेणापासून लाकडाची निर्मिती
भाईंदर : यंदा होळी उत्सव साजरा करताना झाडाऐवजी शेणापासून तयार करण्यात आलेले लाकूड जाळण्याची संकल्पना समोर आली आहे.यामुळे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन उत्तन येथील गो शाळेकडून नागरिकांना करण्यात येत आहे.
होळी उत्सवासाठी शहरातील पारंपरिक पद्धतीने मोठी झाडे जाळली जातात. ही वृक्षतोड थांबवण्यासाठी आणि प्रदूषणावर आळा बसावा म्हणून उत्तन येथील गो शाळेतून होळीसाठी गायीच्या शेणापासून लाकडे तयार करण्यात येत आहेत. ‘केशवसृष्टी’ हा उपक्रम गेल्या वर्षभरापासून राबवत आहे. या गो- शाळेत एकूण २५० गाई आहेत. त्याद्वारे दिवसाला तीन टन शेण गोळा करण्यात येते. त्यापासून लाकडे बनवण्याकरिता भारत विकास परिषद या संस्थेने केशवसृष्टीला एक यंत्र दिले आहे. त्याचप्रकारे लाकडे बनविण्यासाठी शाळेत ६ कामगार काम करत असून एका दिवसात शेणापासून ४०० ते ५०० लाकडे तयार केली जातात. या व्यतिरिक्त तयार करण्यात आलेली ही लाकडे सुखविण्याकरता जवळपास ८ ते १० दिवसाचा कालावधी लागतो. शेणापासून तयार केलेली लाकडे दोन फुट उंचीची आहेत. तसेच लाकडाची किंमत १० रुपये असून तिचे वजन १ किलो इतके असल्याचे डॉ. सुशील अग्रवाल यानी सांगितले आतापर्यंत १५ हजार लाकडे तयार करण्यात आली आहेत. केवळ मीरा—भाईंदर नव्हे तर मुंबईतून ही मोठी मागणी येऊ लागली आहे. यंदा सुमारे ५० हजार लाकडे तयार करण्याचा तसेच वैकुंठभूमीमध्ये देखील याच लाकडांचा वापर करण्याचा प्रयत्न आहे, असे गो शाळेतील सुशील अग्रवाल यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
