महानगरी संस्कृतीत अंगवळणी पडलेल्या मॉल आणि सुपर मार्केटच्या जमान्यात ग्रामीण लोकजीवनाचे व्यवच्छेदक लक्षण असणाऱ्या जत्राही अद्याप तग धरून आहेत. जत्रा मग ती मुंबईतील माऊंट मेरीची असो वा मुरबाडमधील म्हसाची. ओसंडून वाहणारा अमाप उत्साह हे जत्रेचे ठळक वैशिष्टय़. अंबरनाथ येथील शिलाहारकालीन प्राचीन शिवमंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त भरलेली जत्राही त्याला अपवाद नव्हती. विविध प्रकारची खेळणी, खाद्यपदार्थ, गृहोपयोगी वस्तू, देव-देवतांच्या तसबिरी, पुस्तके, पाळणे यांनी खचाखच भरलेल्या जत्रेत फेरफटका मारण्यासाठी शहरालगतच्या ग्रामीण भागातून फार मोठय़ा संख्येने नागरिक येतात. त्यांच्या दृष्टीने जणू ते विंडो शॉपिंगच असते.  
आता आपल्याकडे सामूहिकपणे एका ठिकाणी विविध वस्तूंची विक्री करणारी ग्राहकपेठ व्यवस्था रुजली आहे. जत्रा हे त्याचेच पारंपरिक स्वरूप. जत्रेत पूर्वी दिसणारे ‘मौत का कुँआ’सारखे खेळ आता दिसत नाहीत. पूर्वी एखादा हटयोगी रस्त्यालगतच्या खड्डय़ात स्वत:ला पुरून घेत फक्त हात बाहेर ठेवून यात्रेकरूंना प्रभावीत करीत असे. असले जीवावर बेतणारे खेळ आता कमी झाले असले तरी लहान मुलांना दोरीवर चालायला लावून पैसे मिळविणारे डोंबारी मात्र आताही जत्रेत आढळून येतात. अंबरनाथच्या जत्रेतही ते पाहायला मिळाले.
 दीपक जोशी