मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी हैराण
वसई तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात झोडपणीस सुरुवात केली असून सध्या हे काम करण्यात शेतकरी व्यग्र आहेत. मात्र काही ठिकाणी मजुरांच्या कमतरतेमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
तयार झालेल्या भातपिकाची कापणी केल्यानंतर झोडपणी केली जाते. सध्या वसई ग्रामीण भागात शेतकऱ्यांची भात झोडपणीच्या कामात लगबग सुरू आहे. शेतातील खळ्यात पहाटेपासून झोडपणीची व वाढवणीची कामे सुरू असल्याचे चित्र आहे. यंदा अनियमित पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. पावसाचा सामना करत तग धरून राहिलेली भातपिकांच्या झोडपणीसाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली.
भात हे वसईच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. रत्ना, जया, सुवर्णा, कर्जत, राशीपुनम, कोलम अशा विविध भातबियाणांची लागवड केली जाते.
झोडपणी कशी करतात?
शेतात भाताचे तयार झालेले पीक कापल्यानंतर दोन किंवा तीन दिवस उन्हात पसरवून ठेवले जाते. त्यानंतर त्याचे झोडणीसाठी छोटे भारे बनवले जातात. काही ठिकाणी हे भारे ठेवण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या उडवी बनवल्या जातात. शेतात किंवा घराजवळच्या मोकळ्या जागेत शेणाने जमीन सारवून उडवी तयार केली जातात. टेबल किंवा ओंडक्यावर झोडपणी केली जाते. काही ठिकाणी सध्या यंत्राच्या साहाय्यानेही झोडपणी केली जात आहे.
यंदा अनियमित पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला. रब्बी हंगाम वाया जाऊ नये हीच आशा आहे. यंदा रब्बी हंगामातून ६० टक्के तरी उत्पन्न मिळाले पाहिजे. त्यासाठी शेतकरी घाई करत आहेत.
– आशालता, शेतकरी