पहिल्या पत्नीने विरोधात दावा दाखल केल्याने तिला धडा शिकविण्यासाठी वसईतील एका तरुणाने स्वत:च्याच २५ दिवसांच्या तान्ह्य़ा मुलीला विहिरीत फेकून दिले. यानंतर मुलीचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. वालिव पोलिसांनी उशीच्या अभ्य्रावरून (कव्हर) तपास करून अवघ्या काही तासात आरोपीला अटक केलीे.

आरोपीे निखिल चव्हाण हा रिक्षाचालक असून (३०) वसई पूर्वेच्या वालिव येथील शांती नगरात राहतो. त्याचीे पहिली पत्नी विमल चव्हाण (२४) हीसुद्धा वालीव येथे राहते. पहिल्या पत्नीपासून त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे, तर दुसऱ्या पत्नीपासून दोन वर्षांचा मुलगा आणि २५ दिवसांचीे मुलगी आहे. गुरुवारी मध्यरात्री निखिलने आपल्या तान्हुल्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. माझ्या पहिल्या पत्नीनेच हे कृत्य केले असावे असा संशय त्याने व्यक्त केला. पोलिसांनी निखिल चव्हाण याचीे पहिलीे पत्नी विमल हिच्याकडे चौकशीे सुरू केलीे. मात्र हाती काही लागत नव्हते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी वालिव येथे एका विहिरीत या चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांना या मृतदेहासोबत एका उशीचा अभ्रा आढळून आला. पोलिसांनी तोच दुवा समजून तपास सुरू केला. त्याच उशीने या बाळाचे तोंड दाबून नंतर त्याला विहिरीत फेकले होते. पोलिसांनी आरोपीकडे चौकशीे केली तेव्हा हा अभ्रा माझा नसल्याचे त्याने सांगितले. परंतु त्याच्या दुसऱ्या पत्नीने ते आमचेच असल्याचीे माहिती पोलिसांना दिलीे. पोलिसांनी लगेच त्याच्या घराची झडती घेतली असता तसेच दुसरे कव्हर सापडले.

पोलिसांनी अधिक चौकशीे केल्यावर आरोपीेने गुन्हा कबूल केला. याबाबत वालिव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण पाटील यांनी सांगितले की, त्याच्या पहिल्या पत्नीने त्याच्या विरोधात पोटगीेचा दावा दाखल केला होता. तो निकाल त्याच्या विरोधात लागणार होता. त्यामुळे तिला या गुन्ह्य़ात अडकविण्यासाठी त्याने हे अघोरी कृत्य केले. रात्री पत्नी झोपली असताना त्याने उशीच्या अभ्य्रातून मुलीला लपेटून घरातून नेले आणि विहिरीत टाकून दिले.