अनधिकृत बांधकामप्रकरणी आज आयुक्तांपुढे सुनावणी
अनधिकृत बांधकामप्रकरणी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध असल्याप्रकरणी मीरा-भाईंदर महनगरपालिकेच्या पाच नगरसेवकांची मंगळवारी आयुक्तांपुढे सुनावणी होणार आहे. परंतु यात दोषी ठरणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत की नाहीत, याबाबत प्रशासनातच संदिग्धता असल्याने आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक लियाकत शेख, त्यांच्या पत्नी नगरसेविका शबनम शेख, काँग्रेसचे जुबेर इनामदार व हंसुकुमार पांडे तसेच भाजपचे यशवंत कांगणे यांना सुनावणीसाठी महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. या पाचही जणांविरोधात अनधिकृत बांधकामांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी या प्रकरणी सुनावणी ठेवली आहे. परंतु नगरसेवक अनधिकृत बांधकाम प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला अपात्र ठरविण्याचे थेट अधिकार आयुक्तांना आहेत की नाहीत, याबाबत प्रशासनात गोंधळ आहे. महानगरपालिकेच्या विधी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आयुक्तांना असे अधिकार नसून नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी महासभेची परवानगी आवश्यक आहे. तर दुसरीकडे आयुक्त अच्युत हांगे यांनी याबाबत अद्याप संदिग्धता असल्याचे सांगितले. विधी विभागाने सांगितल्यानुसार हे सर्व नगरसेवक सुनावणीदरम्यान दोषी जरी आढळून आले तरी त्यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करायचा किंवा नाही याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी आयुक्त तसा प्रस्ताव महासभेपुढे पाठवतील.
याआधीही माजी उपमहापौर स्टिवन मेन्डोन्सा, माजी नगरसेविका नयना म्हात्रे यांची अनधिकृत बांधकाम प्रकरणात तत्कालीन आयुक्तांपुढे सुनावणी झाली होती. सुनावणीनंतर न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी प्रस्ताव महासभेपुढे पाठवला परंतु महासभेने नकार दिल्याने ते प्रकरण तेव्हाच संपुष्टात आले. मात्र काही दिवसांपूर्वीच ठाणे महानगरपलिकेच्या आयुक्तांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात एका नगरसेवकाचे पद रद्द केले आहे. या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त सुनावणीत दोषी ठरणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करणार की सुनावणी निव्वळ फार्स ठरणार, याची उत्कंठा आहे.