मातीला आकार देणाऱ्या कलेला देश-विदेशातून मागणी
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्यासाठी ‘टर्मिनल दोन’वर प्रवेश करताच तेथील भारतीय कलेचे दर्शन घडविणारे कलादालन सर्वाचेच लक्ष वेधून घेते. त्यातही या कलादालनात मांडलेली राकू स्मोक या विशिष्ट पद्धतीने तयार केलेली मातीची भांडी न्याहाळण्यासाठी पावले जरा जास्तच काळ थबकतात. कलादालनाची शान वृद्धिंगत करणारी ही वैशिष्टय़पूर्ण मातीची भांडी तयार केली आहेत, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भाईंदरच्या ब्रह्मदत्त पंडित यांनी.
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानांसह राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले पंडित आजही वयाची साठी ओलांडल्यावरही परंपरागत पद्धतीने स्वत: मातीची भांडी तयार करतातच, शिवाय या कलेत त्यांची पत्नी, दोन मुले व सूनही निपुण झाली आहेत. त्यामुळे पंडित यांचे संपूर्ण कुटुंबच या कलेच्या रंगात न्हाऊन गेले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
मातीची भांडी बनविण्याचा घरचा पिढीजात व्यवसाय, मात्र या व्यवसायाचं परंपरागत स्वरूप कायम ठेवून त्याला अत्याधुनिकतेचा साज चढवत थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची किमया ब्रह्मदत्त पंडित यांनी साधली आहे. मूळच्या बिहारमधील नवादा जिल्ह्य़ातल्या छोटय़ाशा गावातून पंडित १९७२ मध्ये मुंबईत आले आणि इथलेच बनले. जे. जे. कला महाविद्यालयात आपल्या मातीची भांडी बनविण्याच्या कलेला त्यांनी खऱ्या अर्थाने आकार दिला. त्याला पैलू पाडले पंडित यांचे गुरू एल. आर. आजगावकर यांनी. सिरामिक्सची भांडी तयार करण्यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले.
सोफिया महाविद्यालयात अध्यापन करतानाच त्यांनी भाईंदर येथे स्वत:चा कारखाना सुरू केला. विविध प्रकारची, आकाराची, रंगांची आणि डिझाइनची सिरामिक्स भांडी या कारखान्यात तयार होतात. पंडितजींनी तयार केलेल्या या कलेला थेट राष्ट्रपती भवनात मानाचे स्थान मिळाले आहे, शिवाय पंडितजींची कला देशभरातील उद्योजक, कलेचे उपासक यांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवत आहे. अनेक देशी-विदेशी कलावंत ही कला आत्मसात करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येतात.
राकू स्मोक म्हणजे काय?
मातीचे मूळ भांडे तयार करतानाच ते सूक्ष्म छिद्रांचे (पोरस) तयार केले जाते. भट्टीत शेकले जात असतानाच त्यावर धूर सोडला जातो. हा धूर भांडय़ावर अगदी अस्सल वाटेल अशी नैसर्गिक डिझाइन निर्माण करतो. यालाच राकू स्मोक असे म्हणतात. दिसायला हे भांडे अतिशय आकर्षत दिसते.
नवे प्रकार
आपल्या कलेचा पारंपरिक बाज कायम ठेवून सतत नवीन प्रयोग करण्याची धडपड असणाऱ्या पंडितजींनी राकू स्मोक, कॉपर रेड, सोडा फायरिंग, क्रिस्टलाईन ग्लेझ असे कलेचे नवे प्रकार पेश करून आपल्या कलेला वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे.