महापालिका निवडणुकीची रणधुमाळी संपताच कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात पुन्हा एकदा फेरीवाल्यांचे जथ्थे दिसू लागले असून यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून कसा मार्ग काढायचा, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. वाहतूक कोंडीसोबत महत्वाच्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीगही दिसू लागले आहेत. त्यामुळे महापौर राजेंद्र देवळेकर आणि आयुक्त ई.रिवद्रन या दोघांनीही दिलेला शहर स्वच्छतेचा नारा फुसका बार ठरणार आहे.
डोंबिवली पूर्वेतील केळकर रोड हे वाहतूक कोंडीसोबतच सदैव कचऱ्याने भरलेला दिसू लागला आहे. रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या रस्त्याला रिक्षा चालकांचा विखळा पडत चालला आहे. याठिकाणी रिक्षाच्या तीन मार्गिका दिसून येतात. एवढय़ा अरुंद रस्त्यावर तीन मार्गिका सुरु असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे. एकेरी वाहतुकीमुळे केळकर रस्त्यावर रिक्षा थांबतात. बहुतांशी नोकरदार वर्ग केळकर रस्ता, मधुबन सिनेमा गल्ली ते रेल्वे स्थानक अशी ये जा करतात. या मार्गावर वाहतूक पोलिसांचे कठोर नियमन असण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. केळकर रस्त्यावर रिक्षा थांब्याजवळ वाहतूक वॉर्डन उभे असतात. परंतु हे कर्मचारीही फारसे प्रभावीपणे काम करत नसल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत.
वाहतुकीच्या समस्येसोबतच या रस्त्यावरील नागरिकांना कचऱ्याचा प्रश्न सतत भेडसावत आहे. या रस्त्याच्या कडेलाच हॉटेल व्यावसायिक, भाजीवाले, रहिवासी कचरा नेऊन टाकतात. भटकी कुत्री हा कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरवतात. यामुळे अध्र्या रस्त्यावर हा कचरा पसरलेला असतो. रस्त्यावर रिक्षांची रांग व कडेला कचरा यामुळे नागरिकांनी चालायचे कोठून असा प्रश्न पडतो. कचरा तुडवतच त्यांना जावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडे वारंवार तक्रार करुनही येथील कचरा हटत नाही. येथील कचराकुंडी हलविण्यात आल्यानंतर नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. या रस्त्याच्या वळणावरच एक रुग्णालयही आहे. त्यांनीही वारंवार तक्रार, निवेदन देऊनही येथील कचरा हटलेला नाही. पालिका प्रशासन या समस्यांकडे कधी लक्ष देणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Nov 2015 रोजी प्रकाशित
डोंबिवली रेल्वे स्थानक पुन्हा कोंडीच्या जंजाळात
डोंबिवली पूर्वेतील केळकर रोड हे वाहतूक कोंडीसोबतच सदैव कचऱ्याने भरलेला दिसू लागला आहे.
Written by मंदार गुरव

First published on: 18-11-2015 at 02:27 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hawkers problem in dombivali railway station