काळ्या यादीत टाकण्याच्या मीरा-भाईंदर महापौरांच्या मागणीकडे पक्षाचे दुर्लक्ष
अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ‘लीना ग्रुप’च्या दिलीप पोरवाल या आघाडीच्या बांधकाम व्यावसायिकाला काळ्या यादीत टाकण्याची मागणी काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरच्या महापौर गीता जैन यांनी केली होती. मात्र महापौरांच्या या मागणीकडे भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने दुर्लक्ष केलेले आहे. कारण ‘कलंकित’ पोरवाल यांच्या मुलाला भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापौरांनी या विकासकाच्या ज्या अनधिकृत बांधकामाबाबत तक्रार केली होती, त्याच इमारतीत थाटण्यात आलेल्या कार्यालयाच्या उद्घाटनाला खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उपस्थिती लावल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
मीरा-भाईंदरमधील आघाडीचे विकासक दिलीप पोरवाल यांच्या लीना ग्रुप या कंपनीने शहरात अनधिकृत इमारती बांधल्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजप नगरसेवक रवी व्यास यांनी केली होती. या तक्रारीची दखल घेत महापौर गीता जैन यांनी ‘लीना ग्रुप’ला काळ्या यादीत टाकण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मीरा-भाईंदरमधील एका बडय़ा विकासकाला महापौरांनी लक्ष्य केल्याने बांधकाम व्यवसाय वर्तुळात खळबळ उडाली होती. दिलीप पोरवाल यांनी मात्र आपणास नाहक बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा खुलासा त्या वेळी केला होता. व्यास यांनी सादर केलेल्या अनधिकृत बांधकामांच्या यादीत भाईंदर पश्चिम येथील नव्वद फुटी रस्त्यावरील पोरवाल यांनी बांधलेल्या एस. एल. पोरवाल शाळेचा तसेच गौरव पोरवाल यांचे सध्याचे कार्यालय असलेल्या इमारतीचादेखील समावेश आहे.
महापौरांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाकडून अद्याप लीना ग्रुपवर कोणतीही कारवाई झालेली नाही, उलटपक्षी महापौर ज्या पक्षाच्या आहेत, त्या भाजपने चक्क दिलीप पोरवाल यांचा मुलगा गौरव पोरवाल यांना पक्षात घेऊन थेट भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष केले आहे. ही नियुक्ती करताना भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही विश्वासात घेतले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोरवाल यांची नियुक्ती करून पक्षाने खुद्द महापौरांचीच अवहेलना केली असल्याचे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रविवारी गौरव पोरवाल यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजप नगरसेवक रवी व्यास व महापौर गीता जैन यांनी पोरवाल यांच्या ज्या इमारतीबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती, त्याच इमारतीत हे कार्यालय असून त्याच्या शेजारीच असलेल्या एस. एल. पोरवाल शाळेत उद्घाटनानंतरचा जाहीर कार्यक्रम पार पडला.
महापौरांचा व्यासपीठावर जाण्यास नकार
कार्यक्रमाला खुद्द प्रदेशाध्यक्ष व मंत्रिमहोदय उपस्थित राहणार असल्याने केवळ राजशिष्टाचार म्हणून महापौर गीता जैन या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. या वेळी त्यांना वारंवार व्यासपीठावर येण्याच्या सूचना दिल्या जात होत्या, परंतु महापौरांनी व्यासपीठावर जाण्यास ठाम नकार दिला. महापौर व्यासपीठावर जात नसल्याने पक्षाचे इतर पदाधिकारी व काही नगरसेवकही व्यासपीठावर जाण्यास तयार नव्हते. मात्र खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी महापौरांना व्यासपीठावर येण्यास सांगितल्यावर त्या व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या.
