ठाणे : महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच, वसंत विहार येथील तुळशीधाम भागातील बीएसयूपीच्या घरांमध्ये नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे यासह आठजणांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू विकास योजनेअंतर्गत २००८ मध्ये शहरी गरिबांसाठी ‘बीएसयूपी’ योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेसाठी ठाणे महापालिकेने १२ हजार ५५० घरांच्या उभारणीसाठी ५६८ कोटी ९४ लाख रुपयांचे प्रकल्प सादर केले. या योजनेची मुदत डिसेंबर २०१५ मध्ये संपली, त्यावेळी प्रत्यक्षात जेमतेम ६,३४३ घरेच महापालिकेला बांधता आली. या प्रकल्पातील घरांची निर्मिती संथ गतीने होत असून त्यासाठीचा खर्च मात्र अफाट होत आहे. शिवाय यापैकी बहुतांश प्रकल्पांची बांधणी निकृष्ट झाली असून या प्रकल्पांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्ष नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. त्यासंबंधीची आकडेवारीही त्यांनी सादर केली होती.
वसंत विहार येथील तुळशीधाम भागातील बीएसयूपी योजनेतील सदनिकांमध्ये काही नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केला होता. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये याबाबत प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली होती. या कामासाठी त्यांनी पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची स्थावर मालमत्ता विभागात नियुक्ती केली होती. या पाचजणांनी केलेल्या तपासणीत वसंत विहार येथील तुळशीधाम भागातील बीएसयूपीच्या घरांमध्ये नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून शिवसेनेचे स्थानिक शाखाप्रमुख शशिकांत कलगुडे यासह आठजणांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीनंतर पोलीस त्यांच्यावर पुढील कारवाई करणार आहेत.
सहभाग कुणाचा?
तुळशीधाम येथील धर्मवीर नगर परिसरातील बीएसयूपी योजनेअंतर्गतच्या इमारतीमधील काही सदनिकांचे वाटप करण्यात आले नव्हते. असे असतानाही या सदनिकांमध्ये काही जण बेकायदा वास्तव्य करीत आहेत. यासंदर्भाच्या तक्रारी ठाणे महापालिकेस प्राप्त झाल्या होत्या. पालिकेच्या तपासणीत तेथील आठ सदनिकांमध्ये नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याचे उघड झाले आहे. हे पालिका अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय शक्य नाही, असा आरोप सातत्याने होत असून पोलिसांच्या चौकशीत हे उघड होण्याची शक्यता आहे. यामुळे याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
तुळशीधाम भागातील बीएसयूपीच्या योजनेतील घरांचे २०१३ मध्ये लोकार्पण झाले. गेल्या सात ते आठ वर्षांपासून यातील काही घरे भाडय़ाने दिली जात असून इतके वर्षे हे भाडे कोणाकडे जात होते, हे उघड होणे गरजेचे आहे. पालिका अधिकाऱ्यांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्यामुळे त्या दिशेनेही तपास व्हायला हवा. मनसेच्या तक्रारीनंतर नेमलेल्या चौकशी समितीची अहवाल अद्याप आलेला नसून तो अहवाल पुढे यायला हवा. – संदीप पाचंगे, मनविसे, ठाणे जिल्हाध्यक्ष
बीएसयुपी योजना हा शहरातला सर्वात मोठा घोटाळा असून तो सुमारे ६०० कोटी रुपयांचा घोटाळा आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत सातत्याने प्रश्न उपस्थित करूनही सत्ताधारी आणि प्रशासनाने माहिती दिली नव्हती. या योजनेवर इतका पैसा खर्च करूनही बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले. यामुळे हा पैसा गेला कुठे? याप्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. – मृणाल पेंडसे, भाजप, ठाणे शहर महिला अध्यक्ष
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2022 रोजी प्रकाशित
‘बीएसयूपी’ सदनिकांमध्ये बेकायदा वास्तव्य; शिवसेना शाखाप्रमुखासह आठ जणांवर गुन्हा दाखल
महापालिकेच्या बीएसयूपी योजनेतील सदनिकांच्या वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप होत असतानाच, वसंत विहार येथील तुळशीधाम भागातील बीएसयूपीच्या घरांमध्ये नागरिक बेकायदा वास्तव्य करीत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 03-05-2022 at 00:02 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal occupancy bsup flat case shiv sena branch chief municipal corporation amy