आधुनिक भोगवादी जीवनशैलीमुळे अपरिहार्यपणे भेडसावणाऱ्या दुष्परिणामांना तोंड द्यायचे असेल तर ‘योग’ हाच पर्याय आहे, हे कळते, पण अनेकदा वळत नाही. अखेर गेल्या वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योग दिनी सामूहिक योगसाधना करण्याचा पायंडा पडला. शाळेपासून ज्येष्ठ नागरिकांच्या कट्टय़ांपर्यंत सर्व थरातील व्यक्तींनी सामूहिकपणे मोठय़ा संख्येने विविध आसने करून हा योग दिन साजरा केला. भल्या पहाटे पडलेल्या मुसळधार पावसानेही या उत्साहावर पाणी फिरविले नाही. दादोजी कोंडदेव स्टेडिअममध्ये योगोत्सुक नागरिकांनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती. शहरातील विविध शाळांमध्येही विद्यार्थ्यांनी आनंदाने योगासनांचा अभ्यास केला. काहींनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात शांत चित्ताने ध्यान लावून मनावरील ताण हलका करण्याचा प्रयत्न केला..