भारतीय शास्त्रीय संगीत एकसंध असून त्यात ऊर्जा निर्माण करण्याची ताकद आहे, तर पाश्चात्त्य संगीतात गोडवा असला तरीही ते विखुरले आहे, असे मत जपानी सारंगीवादक युजी नाका गावा यांनी व्यक्त केले. कल्याणच्या श्री कला मंडळ संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या निमित्त युजी नाका गावा यांनी सारंगीवादनाचे प्रात्यक्षिक सादर केले. ओक हायस्कूलच्या बालक मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला.
युजी नाका गावा यांनी सारंगीवादनाची सुरुवात ‘पटदीप’ रागाने केली. त्यानंतर त्यांनी सादर केलेल्या ‘सखीरी पद नाचे झुमझुम’ या बंदिशीने कार्यक्रम बहरला. तीनतालातील झिंजोटी रागाचे सादरीकरणही त्यांनी केले. जपानमधील लहान मुलांच्या ‘रेड ड्रॅगन फ्लाय’ या लोकगीताचे भूपाळी आणि शुद्ध कल्याण रागात रूपांतर करून त्याचे सादरीकरण त्यांनी केले. संगीत, गाणे हे भाषा, धर्म यापलीकडे असते. ते आपले हृदय जिंकून घेते, हे त्यांच्या सादरीकरणातून व्यक्त झाले. या कार्यक्रमात या जपानी कलाकाराला रूपक पवार यांनी तबल्यावर साथसंगत केली. कार्यक्रमाची सांगता नाका गावा यांनी मिश्र पिलू रागातील व अद्धा तालातील धून वाजवून केली.
युजी नाका गावा हे व्यवसायाने ग्राफिक डिझायनर असून संगीत विशारदही आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण वाराणसीचे उत्साद फय्याज अलीखान यांच्याकडे झाले. २००५ पासून ते पंडित बुदुखौसाहेब घराण्याचे शिष्य पंडित धृव घोष यांच्याकडे तालीम घेत आहेत. त्यांचे सारंगीवरचे प्रभुत्व या कार्यक्रमामुळे कल्याणकरांसमोर आले. यावेळी शास्त्रीय संगीत शिकत असलेले जपानी कलाकार आणि जपानी दूतावासातील युजी यांचे मित्र परिवार कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री कला मंडळ शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवत असून या मंडळामध्ये तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक अरविंद बुधकर यांनी केले.