खारेगावची कांदळवने वाचवण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष; दोन वर्षे उलटूनही नैसर्गिक प्रवाह खुले करण्यात टाळाटाळ
किशोर कोकणे
ठाणे : खारेगाव येथील खारफुटी संवर्धनासाठी पर्यावरणप्रेमींकडून प्रयत्नांची शर्थ केली जात असताना ठाणे महापालिका मात्र याबाबत पूर्णत: उदासीन आहे. येथील उरलेली कांदळवने वाचवण्यासाठी चर मारून पाण्याचे नैसर्गिक प्रवाह पुन्हा सुरू करा, असे स्पष्ट आदेश जिल्हा पाणथळ समितीने पालिकेला दिले होते. मात्र, अन्यत्र कोटय़वधीच्या निविदा काढण्यासाठी प्रचंड कार्यतत्परता दाखवणाऱ्या पालिकेला चर खोदण्यासाठी निविदा काढणे जमलेले नाही.
ठाणे महापालिका क्षेत्रातील खारेगाव टोल नाका परिसर गेल्या काही वर्षांपासून डेब्रिज माफियांसाठी नंदनवन ठरू लागला आहे. या भागात महामार्गाच्या कडेला खाडीकिनारी दररोज शेकडोंच्या संख्येने डेब्रिजच्या गाडय़ा रित्या केल्या जात असून सर्व शासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करत आहेत. करोनाकाळात तर माफियांचे हे उद्योग अगदी बिनधोकपणे सुरू होते. दिवा, मुंब्रा खाडीकिनाऱ्याची जैवविविधता नष्ट केल्यानंतर भूमाफियांनी खारेगाव खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर खारफुटींची कत्तल केली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या ठिकाणी सात ते आठ हजार डम्पर राडारोडा टाकून या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या घटनेची माहिती पर्यावरणवादी संघटनांना मिळाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार पाणथळ समितीकडे केली होती. त्यानंतर पाणथळ तक्रार निवारण समितीने ठाणे महापालिका, वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला कारवाईच्या सुचना केल्या होत्या. पथकाने या ठिकाणी पाहणी केली असता, त्यामध्ये खाडीच्या पातळीपासून १५ ते २० फूट उंच अतिक्रमण झाले होते. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच भरावामुळे बंद झालेले नैसर्गिक प्रवाह खुले करण्यासाठी चर खोदण्याच्या सूचना पाणथळ समितीने पालिकेला केल्या होत्या. मात्र, याबाबत अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.
खारफुटी जगविण्यासाठी पाणथळ समितीने या ठिकाणी महापालिकेस तीन चर काढून येथील नैसर्गिक प्रवाह खुले करून देण्याच्या सूचना केल्या होत्या, परंतु दोन वर्षे उलटत असतानाही महापालिकेने या ठिकाणी केवळ एकाच ठिकाणी चर काढलेला आहे. उर्वरित ठिकाणी चर नसल्याने खारफुटींना खाडीचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उर्वरित खारफुटींची वाढ होणे कठीण झाले आहे. खारफुटींना मिळणारे पाणी रोखल्याने खारफुटी मृत होतील, अशा तक्रारी पर्यावरणवादी संघटना करत आहेत.
महापालिकेला तीन ठिकाणी चर काढण्यास सांगण्यात आले आहे, परंतु दोन वर्षांत महापालिकेने एकाच ठिकाणी चर काढली आहे. महापालिकेला खारफुटींबाबत गांभीर्य उरलेले नाही. महापालिकेविरोधात लवकरच तक्रार करू. – स्टॅलीन दयानंद, सदस्य, पाणथळ संवर्धन समिती
महापालिकेने एका ठिकाणी चर काढली आहे. उर्वरित ठिकाणच्या चरींसाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येईल. – मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी, ठाणे महापालिका