समाजातील काही व्यक्ती, संस्था सभोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करीत भविष्याची गरज लक्षात घेऊन कृतिशील पाऊल उचलतात आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध रीतीने आपली योजना राबवतात. कागदावरची कोणतीही चांगली योजना प्रत्यक्षात जेव्हा नियोजनपूर्वक, अभ्यासपूर्ण रीतीने राबवली जाते तेव्हाच ती यशस्वी होते. गेली काही वर्षे सातत्याने समाजातील सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील वाचनाचे कमी होत असलेले प्रमाण हा एक चर्चेचा विषय होता आणि आहे. यावरून सातत्याने ऊहापोह, चर्चा सुरू असते आणि आरोप-प्रत्यारोपही होत असतात. रकानेच्या रकाने भरून लेख, दृक् श्राव्य माध्यमांमधून चर्चात्मक कार्यक्रम (विशेषत: मराठी दिन जवळ आल्यावर) प्रसिद्ध झाले. पण नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने मात्र या चर्चामध्ये न पडता एक वैशिष्टय़पूर्ण उपक्रम राबवताना पुस्तकांनाच वाचकांच्या जवळ नेले आणि आबालवृद्धांना ‘वाचू आनंदे’चा जीवन समृद्ध करणारा अनुभव वैविध्यपूर्ण पुस्तकांच्या माध्यमातून देऊ केला.
खरे तर आपली आणि आधीच्या पिढय़ा या वाचनसंस्कारातूनच घडल्या आहेत. अगदी बालपणापासूनच परिकथा, जादूच्या गोष्टी, अकबर बिरबल, अशी अनेकविध पुस्तके आपल्याला विविध टप्प्यांवर सातत्याने सोबत करीत गेली. आपले त्या त्या वयातील भावविश्व या वाचनसंस्काराने व्यापून जात असे आणि मराठी भाषेची गोडी आपोआप निर्माण होत असे, आत्मीयता निर्माण होत असे. भाषा समृद्ध होत असताना विविध व्यक्तिरेखांच्या माध्यमांतून होणारे वैचारिक संस्कार आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान करीत असत. जडणघडणीच्या काळात आपल्यावर चांगल्या आचारविचारांचे संस्कार या पुस्तकांनी केलेच, पण मराठी भाषेतील कवी, लेखक, विविध स्वरूपांचे लेखन याच्याशी परिचय होत गेल्याने मराठी भाषाही चांगली होत गेली. पुस्तके आणि वाचन, त्याचबरोबर चांगले वैचारिक कार्यक्रम, चर्चा, व्याख्यानमाला आवर्जून ऐकण्याची वृत्तीही आपोआप जोपासली गेली. वाचन आणि श्रवण हे दोन्हीही होत असे. अमेरिकी शिक्षणतज्ज्ञ आणि हॉर्वड विद्यापीठाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले चार्लस एलिएट यांनी पुस्तके किती विविध रूपांत आपल्याला सोबत आणि मार्गदर्शन करीत राहतात हे समर्पक शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात, ‘Books are the quietest and most constant of friends; they are the most accessible and wisest of counselors, and the most patient of teachers.’ अर्थात ‘पुस्तके ही सर्वात शांत आणि निरंतर मित्र, सर्वात शहाणे आणि सहज उपलब्ध असलेले समुपदेशक आणि सर्वात संयमी शिक्षक असतात.’
मानवी जीवनातले पुस्तकांचे महत्त्व लक्षात घेऊनच कुसुमाग्रज प्रतिष्ठान बालवाचकांना ‘वाचू आनंदे’चा समृद्ध अनुभव देताना वाचनाची गोडी लावण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले. गेल्या वर्षी ७ फेब्रुवारी रोजी बालवाचनालयाच्या अभिनव उपक्रमाचे नाशिकमध्ये उद्घाटन करण्यात आले. बालवाचकांसाठी तयार करण्यात आलेल्या एका पेटीमध्ये १५ मराठी आणि १० इंग्रजी अशा निवडक पुस्तकांचा समावेश असतो. साधारणपणे २ महिन्यांनंतर ही पेटी बदलली जाते आणि मुलांना दुसऱ्या पेटीतील पुस्तके वाचायला मिळतात. अशा तऱ्हेने ही साखळी सुरू राहते. इ. २री ते ७वीच्या मुलांसाठी या पेटय़ा तयार करण्यात आल्या आहेत.
बालवाचकांसाठी एका छोटय़ा दप्तरवजा सुबक पिशवीत ही पुस्तके उपलब्ध होतात. त्यावर मध्यभागी ‘माझं ग्रंथालय’ (बाल विभाग) असे शीर्षक आणि कोपऱ्यात प्रसिद्ध साहित्यिक कुसुमाग्रजांचे चित्र आहे. दर २ महिन्यांनी मिळणाऱ्या नव्या पेटीविषयी मुलांमध्ये औत्सुक्य निर्माण होते. शिवाय आपल्या सोयीनुसार आपल्या आवडीचे पुस्तक आपल्याला हवे तेव्हा मुलांना वाचता येते, पण सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे जशी मुले पुस्तकांशी जोडली जात आहेत
‘माझं ग्रंथालय’ (बाल विभाग) या योजनेला पुढील महिन्यात १ वर्ष पूर्ण होईल. या योजनेचे यश लक्षात घेऊन वर्षपूर्तीनिमित्ताने आणि नववर्षांची भेट म्हणून ‘तरुणाई’ (इ. ८वी आणि पुढील महाविद्यालयीनच नव्हे, तर पदव्युत्तर या वयोगटापर्यंत) ही अभिनव योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचे शिल्पकार विनायक रानडे यांच्याकडे एखाद्या कार्याला प्रत्यक्षात कार्यान्वित करताना- कार्यसिद्धीस नेताना उद्दिष्ट प्राप्त करण्याची दृष्टी आहे. ही योजना महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आणि परदेशातही यशस्वीपणे राबवली जात आहे. पुढे ‘माझं ग्रंथालय’ (मोठय़ांसाठी), बालवाचकांसाठी ‘माझं ग्रंथालय’ (इ. २री ते ७वी) आणि आता नववर्षांनिमित्त ‘तरुणाई’ (इ. ८वी आणि पुढे महाविद्यालयीन विद्यार्थी) असा अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
शाळेच्या बाकावरून : विद्यार्थ्यांना वाचनसमृद्ध करणारी चळवळ
समाजातील काही व्यक्ती, संस्था सभोवतालच्या परिस्थितीचे अवलोकन करीत भविष्याची गरज लक्षात घेऊन कृतिशील पाऊल उचलतात आणि आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय नियोजनबद्ध रीतीने आपली योजना राबवतात. कागदावरची कोणतीही चांगली योजना प्रत्यक्षात जेव्हा नियोजनपूर्वक, अभ्यासपूर्ण रीतीने राबवली जाते तेव्हाच ती यशस्वी होते. गेली काही वर्षे सातत्याने समाजातील सर्व थरांतील, सर्व वयोगटांतील वाचनाचे कमी होत असलेले प्रमाण […]
Written by हेमा आघारकर

First published on: 12-01-2016 at 07:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kusumagraj pratisthan create movement to enrich students reading