‘दत्तधाम वसाहती’तील महिलांना ‘जनसेवा फाऊंडेशन’ दत्तक घेणार; चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यावर भर

कुष्ठरोग झाल्यानंतर कुटुंबाने संबंध तोडल्यानंतरही जगण्याची जिद्द असलेल्या महिलांनी वसईमध्ये ‘दत्तधाम वसाहत’ उभारून समाजापुढे आदर्श निर्माण केला. ‘लोकसत्ता वसई-विरार’ने या महिलांच्या स्वाभिमानी लढय़ाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत या महिलांच्या मदतीला ‘जनसेवा फाऊंडेशन’ ही सामाजिक संस्था धावून आली आहे. या संस्थेने या महिलांना दत्तक घेतले असून या महिलांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी ही संस्था प्रयत्न करणार आहे.

जागतिक महिला दिनी वसईतील दत्ताधाम वसाहतीतील महिलांच्या यशस्वितेची माहिती सागणारी ‘कुष्ठरोगापुढे न झुकता स्वाभिमानाने जगण्याचा लढा’ ही बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर या महिलांचे वेतन, गरजा लक्षात घेऊन नायगाव येथील विजय वैती यांनी आपल्या ‘जनसेवा फाऊंडेशनतर्फे’ या महिलांना दत्तक घेतले आहे. त्यांच्या औषधोपचाराचा सर्व खर्च ही संस्था करणार आहे. वयोमानानुसार त्यांच्या समस्या वाढत गेल्या. त्यांचे आजारपण, मुलांचे शिक्षण, त्यांच्या उपचारासाठी लागणारी औषधे यासाठी त्यांची मुले कमावत असली तरी हे पैसे त्यांच्यासाठी अपुरे आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊ  नये यासाठी त्यांना दत्तक घेतल्याचे जनसेवा फाउंडेशनच्या विजय वैती आणि प्रीती वैती यांनी सांगितले.

महिलांची कृतज्ञता

या महिलांच्या मदतीला ‘जनसेवा फाऊंडेशन’ ही संस्था धावून आल्यानंतर या महिलांच्या भावना अनावर झाल्या. ‘‘आम्हाला आजार झाल्यानंतर कुटुंबाने आणि समाजानेही परके केले. त्या वेळी आम्हाला हात पसरवण्याशिवाय दुसरा उपाय नव्हता. मात्र तुमच्यासारखी माणसे आमचा सन्मान करतात, आम्हाला मदत करतात, ही मोठी गोष्ट आहे,’’ अशा शब्दांत या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली.