एक हजार रुपयांची जुनी नोट बाद होऊन दोन हजारांची नवीन नोट बाजारात आली. या नोटेची फारशी माहिती नसल्याने एका तरुणाने बनावट नोट बनवून ती खपविण्याचा केलेला प्रयत्न फसला आहे. या तरुणाने दोन हजाराच्या नोटेची झेरॉक्स काढून हुबेहूब नोट बनवली, पण ती वटवताना बनावट नोट असल्याचे लक्षात आले आणि विरार पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन चलनातील बनावट नोटेचा हा पालघर जिल्ह्य़ातील पहिलाच गुन्हा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

[jwplayer 8cIf7m5X]

विरार पश्चिमेच्या आर. आर. सामंत इमारतीत राज वाइन्स नावाचे दुकान आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे दुकानात ग्राहकांची गर्दी होती. त्या वेळी तुषार चिखले (२६) हा तरुण बीअर घेण्यासाठी दुकानात आला होता. त्याने दोन हजारांची नोटा देऊन तीन बीअर घेतल्या. मात्र त्याने दिलेली नोट पाहून दुकान मालक विश्वनाथ शेट्टी (४५) यांना संशय आला. त्यांनी विचारपूस केली असता तुषारने उडवाउडवीची  उत्तरे दिली. शेट्टी यांनी विरार पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी ती नोट तपासली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे

आरोपीकडून सात बनावट नोटांचे झेरॉक्स केलेले तुकडे जप्त  करण्यात आले आहेत. एका दुकानातून त्याने ते झेरॉक्स करवून घेतले होते. चार-पाच प्रयत्नांनंतर त्याने हुबेहूब बनावट नोट बनविली होती. त्याने यापूर्वी ही नोट बनवून कुठे खपवली होती का, तसेच त्याचे अन्य साथीदार आहेत का, याचा शोध घेत आहोत.

–  युनूस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

खबरदारी घ्या

दोन हजारांच्या नोटा या नवीन बाजारात आलेल्या आहेत. लोकांनी ती फारशी हाताळली नसल्याने ती खरी का खोटी याची लवकर कल्पना येत नाही. त्यामुळे ती स्वीकारताना अधिक खबरदारी घ्या, असे आवाहन विरार पोलिसांनी केले आहे.

[jwplayer zkvFlBpu]

 

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man arrested for using photocopy of rs 2000 note