ठाणे : एका ३३ वर्षीय महिलेवर चाकूहल्ला करून शोभराज राघनी (५४) याने हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी बाळकुम नाका येथे उघडकीस आला. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्यातील सावरकरनगर परिसरात ३३ वर्षीय महिला राहते. तर, शोभराज राघनी हा कल्याणमध्ये राहत होता. सुमारे पाच वर्षांपासून शोभराज याची महिलेसोबत ओळख होती. बुधवारी शोभराज आणि महिलेने बाळकुम येथील एका हॉटेलमध्ये एक खोली भाडय़ाने घेतली. मात्र, बुधवारी सायंकाळी महिला आणि शोभराज या दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शोभराजने धारदार चाकूने महिलेवर हल्ला केला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर शोभराजने खोलीच्या खिडकीतून उडी मारली. यात शोभराजच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती कापूरबावडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमी महिलेला एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
