डोंबिवली परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करणारा आणि डोंबिवली-ठाणे अंतर अवघ्या पंचवीस मिनिटांचे करणारा माणकोली येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार’ नेमण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर, नाहूर-ऐरोली-काटई नाका (शिळफाटा) हा प्रकल्प सुरू करण्यासाठी या भागातील वन जमीन ताब्यात घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचे काम ‘एमएमआरडीए’कडून हाती घेण्यात आले आहे.आठ महिन्यांपूर्वी ‘एमएमआरडीए’ने डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर भागात उल्हास खाडीवर उड्डाण पूल बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. चार ते पाच ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरल्या आहेत. या कामासाठी ‘एमएमआरडीए’ने सुमारे तीनशे कोटीचा निधी प्रस्तावित केला आहे. रेतीबंदर ते खाडी पलीकडील माणकोली गावापर्यंत हा पूल उभारण्यात येणार आहे.या पुलाला मोठागाव ते रेतीबंदर दरम्यान २२० मीटर लांबीचा ६० फूट रुंदीचा पोहच रस्ता बांधण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने पोहच रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहे.माणकोणी उड्डाण पूल व लगतचा पोहच रस्ता तयार करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे मुख्य अभियंता स. भ. तामसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. व्यवस्थापन सल्लागारांचे प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया गेल्या आठवडय़ापासून सुरू करण्यात आली आहे. ४ सप्टेंबर रोजी सल्लागारांचे प्रस्ताव स्वीकारण्याची अंतिम मुदत आहे.
नाहूर-ऐरोली-काटई मार्ग
मुंबईतील ठरावीक मार्गावरील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने नाहूर-ऐरोली ते काटई नाका (डोंबिवली-शिळफाटा) रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित महामार्गाच्या काही भागात वन विभागाची जमीन आहे. वन विभागाच्या जमिनीवरून रस्ता तयार करताना ती जमीन संपादन व त्यांची परवानगी घेणे बंधनकारक असल्याने एमएमआरडीएने वनविषयक परवानगीसाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे दोन्ही उड्डाण पूल, महामार्ग प्रकल्प मार्गी लागले तर कल्याण, डोंबिवली परिसरातील वाहतुकीचे विकेंद्रीकरण होऊन वाहतुकीच्या कोंडीत अडकलेली कल्याण डोंबिवली शहरे, शिळफाटा रस्ता मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2015 रोजी प्रकाशित
माणकोली उड्डाणपुलाच्या निर्मितीला चालना
डोंबिवली परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी करणारा आणि डोंबिवली-ठाणे अंतर अवघ्या पंचवीस मिनिटांचे करणारा माणकोली येथील उड्डाणपुलाच्या कामासाठी ‘प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार’ नेमण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
First published on: 01-09-2015 at 12:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mankoli flyover now in working progress