विरार, नालासोपाऱ्यात कडकडीत बंद; वसईत संमिश्र प्रतिसाद
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘सकल मराठा क्रांती मोर्चा’ने गुरुवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विरार आणि नालासोपाऱ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला, तर वसईत मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. बाजारपेठा आणि सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता.
९ ऑगस्ट हा आदिवासी दिन असल्याने पालघर जिल्ह्यात बंद पाळू नये, असे आवाहन मराठा नेत्यांना केले होते. त्यामुळे त्यांनी त्याला प्रतिसाद देत केवळ वसई तहसीलदार कार्यालयावर रॅली काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र सकाळी वसईत रॅली निघाली असताना इतर भागात आंदोलक घोषणाबाजी करीत शहरातून फिरत होते. नालासोपारा आणि विरार पूर्वेला दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आली. विरार पश्चिमेला दुपापर्यंत व्यवहार सुरळीत होते. मात्र आंदोलकांनी विरार पूर्वेला रिक्षा बंद पाडल्या आणि दुकाने बंद केली. आंदोलकांना पाहून दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेला कडकडीत बंद पाळण्यात आला. रिक्षा पूर्ण बंद होत्या, त्यामुळे नागरिकांना पायपीट करीत घर गाठावे लागले. एरवी गजबजलेल्या नालासोपारा येथील रस्त्यावर गुरुवारी शुकशुकाट असल्याचे दिसून येत होते.
वसई पूर्वेला असलेल्या औद्योगिक वसाहतीत सकाळी कामगार आल्याने त्या सुरू होत्या. मात्र दुपारनंतर तिथे आंदोलक गेले आणि त्यांनी कंपन्या बंद करण्यास सांगितले. त्यामुळे दुपारनंतर कंपन्या बंद झाल्या. सातिवली, वालीव येथील औद्योगिक कंपन्यातील कामगारांना रेल्वे स्थानकात येण्यासाठी पायपीट करावी लागली. वसईत रेल्वे स्थानक परिसर, अंबाडी रोड वगळता अंतर्गत भागातील दुकाने, बाजारपेठा सुरू होत्या. उपाहारगृहेही बंद असल्याने लोकांचे हाल झाले.
विरार पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर, मनवेलपाडा येथे रस्त्यावर शुकशुकाट होता. रिक्षा नसल्याने रस्ते मोकळे होते. मात्र रेल्वे स्थानकातून उतरलेल्या प्रवाशांना घरी जाण्यासाठी पायपीट करावी लागली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
९ ऑगस्टच्या बंदसाठी पोलिसांनी चांगलीच पूर्वतयारी केली होती. मराठा संघटनाच्या नेत्यांच्या बैठका घेऊन कुठलाही हिंसक प्रकार घडणार नाही, जबरदस्ती केली जाणार नाही याची ग्वाही घेतली होती. सकाळी रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकांत संचलन करून प्रवाशांना आश्वस्त केले. शहरात जागोजागी पोलिसांचे पथक, राज्य राखीव पोलीस बलाच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या होत्या. रॅलीच्या वेळी कुणी आततायीपणा करणार नाही याची खबरदारी पोलीस घेत होते. मात्र काही ठिकाणी तरुणांचे टोळके जबरदस्ती करताना आढळून आले. आमचे कुणी नेते नाहीत, आम्ही आमच्या मागण्यांसाठी आलो आहोत, अशी दटावणी ते करीत होते. मागील आंदोलनात परप्रांतीयांनी घुसखोरी केली होती. त्यामुळे पोलीस नजर ठेवून होते. साध्या वेषातील पोलीस मोबाइलमध्ये आंदोलकांचे चित्रीकरण करीत होते. गडबड केली तर गुन्हे दाखल केले जातील, अशी तंबी दिली जात होती. काही आंदोलकांच्या हातातील काठय़ा पोलिसांनी काढून घेतल्या. तरुणी या वेळी मोठय़ा संख्येने आंदोलनात दिसून आल्या.
नालासोपाऱ्यात बाइक रॅली
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी नालासोपारा येथून बाईक रॅली काढण्यात आली. ही रॅली नालासोपारा ते वसई तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आली. ही रॅली आणि मोर्चा वसई तहसील कार्यालयावर शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीमध्ये येऊन धडकला. तहसील कार्यालयाजवळ कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मोठय़ा प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना यावेळी घडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.