‘कुटुंब प्रथम’ वक्तव्य पक्षाविरुद्ध असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया

भाजपने उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करणारे ओमी कलानी यांच्या समर्थनार्थ वक्तव्य करणाऱ्या उल्हासनगरच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी यांच्याविरोधात भाजपने नगरसेवकांची मोट बांधण्यास सुरुवात केली असून विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या सोबतीने महापौरांना अल्पमतात आणण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

ओमी कलानी यांचा अर्ज दाखल करताना महापौर पंचम कलानी यांनी ‘आधी कुटुंब, मग पक्ष’ असे वक्तव्य केले होते. गल्लोगल्ली प्रचार करताना प्रथम देश, मग पक्ष आणि नंतर स्वत: अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजपच्या नेत्यांना ही बाब चांगलीच झोंबली असून त्यामुळे पक्षातील निष्ठावंत गट सक्रिय झाला आहे. उल्हासनगरच्या विधानसभेच्या जागेसाठी कलानी कुटुंब इच्छुक असताना भाजपने त्यांना तिकीट नाकारल्याने कलानी कुटुंबाने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे धाव घेतली आहे. विद्यमान आमदार ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवारी अर्ज भरल्यानंतरही ओमी कलानी यांनी पुन्हा पक्षातर्फे दुसरा अर्ज भरला. त्यावेळी ओमी कलानी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि उल्हासनगरच्या भाजपच्या महापौर पंचम कलानी याही उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी भाजप महापौरांच्या येण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर त्याच वेळी भाजपच्या उमेदवारासाठी महापौरांची अनुपस्थिती शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती. महापौर पंचम कलानी यांनी पक्ष नंतर आधी कुटुंब असे वादग्रस्त वक्तव्य यावेळी केले होते. त्यानंतर भाजप निष्ठावंत पदाधिकारी आणि नगरसेवकांत नाराजी पसरली आहे.

भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन सत्तेचा लाभ घेणाऱ्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असतील तर हा पक्षाचा अपमान असल्याची भावना अनेक पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. तर प्रथम देश, मग पक्ष आणि मग स्वत: असे घोषवाक्य असलेल्या भाजपात अशा प्रकारची वक्तव्ये स्वीकारली जात नाही, अशी प्रतिक्रिया एका जुन्या भाजप नगरसेवकाने दिली आहे. त्यामुळे अशांना पक्षाकडून मिळालेल्या सत्तेचा लाभ घेण्याचा अधिकार नाही, अशीही भावनाकाही निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यांनी याबाबत वरिष्ठांशी संपर्क करत महापौर कलानी यांची तRोर केल्याची माहिती मिळत आहे.

महापौर पद धोक्यात?

महापौर कलानी यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याच्या तक्रारी निष्ठावंत गटाने केल्या असून त्यांना पदावरून हटविण्याच्या हालचाली कराव्यात यासाठी दबाव आणला जात आहे. त्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी आता कलानी यांच्या या विधानावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे कलानी यांचे महापौर पद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.