१५ हजारांपासून दीड लाख रुपयांपर्यंत सभासद शुल्क; व्यवस्थापन पालिकेकडेच राहणार
कोटय़वधी रुपयांचा निधी खर्च करून घोडबंदर भागातील रहिवाशांसाठी ढोकाळी भागात उभारण्यात आलेले शरदचंद्रजी पवार मिनी क्रीडा संकुल तब्बल पावणेदोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर खुले होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र या संकुलातील सभासद शुल्क १५ हजार रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत आकारण्यात येणार असल्याने ‘ठाणे क्लब’प्रमाणे याठिकाणीही सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना जाणे कठीण बनणार आहे. हे संकुल ‘ठाणे क्लब’च्या धर्तीवर खासगी संस्थेस चालविण्यास देण्याचा निर्णय पक्का करण्यात आला असून प्रत्येक वर्गात खासगी संस्थेस १५० ते २०० सभासद करण्याचे अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे येथील सभासद होण्यासाठी नजीकच्या काळात नवी वशिलेबाजी सुरू होऊ शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरदचंद्रजी पवार मिनी क्रीडा संकुलाचे उद्घाटन झाले. उद्घाटन होऊन दीड वर्षांचा काळ लोटला तरी क्रीडा संकुल खेळाडूंसाठी खुले करण्यात आले नव्हते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून टीकेचे धनी ठरत असलेल्या महापालिका प्रशासनाने अखेर संकुल खुले करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. या प्रस्तावानुसार क्रीडा संकुलाचे सभासदत्व स्वीकारणाऱ्या नागरिकांकरिता इनडोअर, आऊट डोअर गेम्स, ग्रंथालय आणि करमणूक खोली उपलब्ध करून देण्यात येणार असून या संकुलाला एक प्रकारे ‘क्लब’चा चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक खेळाडूकरिता संकुलातील सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी काही
राजकीय पुढाऱ्यांकडून व्यक्त होत होती. मात्र महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावामुळे त्यास आता पूर्णविराम लागला आहे.
हे संकुल खासगी संस्थेस चालविण्यास देण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी क्रीडा संकुलाचे व्यवस्थापनाचे अधिकार महापालिकेने स्वत:कडे ठेवले आहेत. महापालिका प्रशासनाच्या प्रस्तावानुसार या संकुलाचे आजीव सभासदत्व हवे असेल तर दीड लाख आणि विविध खेळांचे मासिक शुल्क शंभर रुपये असणार आहे. तसेच आजीव सभासदत्व (सर्वसाधारण), दहा तसेच पाच वर्षांकरिता सभासदत्व सुमारे ७५ ते १५ हजारांपर्यंत प्रवेश शुल्क असणार आहे. याशिवाय, वार्षिक तसेच मासिक शुल्कही भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सभासदत्वात ५० टक्के सवलत देण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच सभासदत्व शुल्काऐवजी कोणतीही दरवाढ करण्याचा अधिकार संस्थेला राहणार नाही. सभासदांकडून मिळणारे शुल्क बँकेत स्वतंत्र खाते उघडून ठेवण्याची अट घालण्यात आली असून, या खात्यामधून सोयी तसेच सुविधांकरिता होणाऱ्या खर्चाचा तपशील घेण्यात येणार आहे. प्रत्येक वेळी सोयी तसेच सुविधांना मंजुरी देताना किंवा अन्य कार्यालयीन प्रक्रिया करण्यात वेळ गेला तर तेथील देखभाल यशस्वीपणे करणे शक्य होणार नाही. यासाठी क्रीडा संकुलाचे संपूर्ण अधिकार समिती तसेच निर्णय घेण्याकरिता समिती स्थापन करण्याचा पर्याय महापालिकेने सुचविला असून या समितीमध्ये अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त, तर कार्याध्यक्षस्थानी महापौर असणार आहेत. त्याचप्रमाणे उपाध्यक्षस्थानी विरोधी पक्षनेता आणि क्रीडा सभापती, सदस्यपदी माहिती व जनसंपर्क अधिकारी व क्रीडा अधिकारी असणार आहेत.