दोन दलाल महिलांना अटक
पश्चिम बंगालमधून कामधंद्याचे आमिष दाखवून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली आहे. याप्रकरणी दोन दलाल महिलांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील २४ परगणा येथील एका १७ वर्षीय मुलीला मुंबईत कामधंदा मिळवून देण्याच्या आमिषाने आणण्यात आले होते.काशिमीरा येथील एका इमारतीत तिला ठेवण्यात आले होते. मुंबईत चांगल्या ठिकाणी नोकरी देऊ, चांगला पगार मिळाला की चांगल्या पद्धतीने राहता येईल, असे तिला सांगण्यात आले.
[jwplayer zZz7idXw-1o30kmL6]
परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी तिला अश्लील नृत्य करण्याचे धडे देण्यात येऊ लागले. या पद्धतीने भरपूर पैसा कमावता येईल, असे मुलीला सांगितल्यानंतर यात काही तरी काळेबेरे असल्याचा संशय मुलीला आला. मुलीला मुंबईतल्या बारमध्ये अथवा अनैतिक व्यवसायात ढकलण्यासाठीच मुंबईत आणले असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी संधी मिळताच मुलीने घरातून स्वत:ची सुटका करवून घेतली. या वेळी स्थानिक रहिवाशांनी मदतीचा हात पुढे करत तिला काशिमीरा पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी त्वरेने हालचाल करून मुलगी राहत असलेल्या घरात छापा टाकला आणि दोन महिलांना अटक केली. या वेळी त्यातील एका महिलेचा आरोपी पती पळून जाण्यात यशस्वी ठरला. या घरात आणखी काही मुलींना आणून ठेवण्यात आले असल्याचा संशय पोलिसांना असून ते फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या मुलीला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले आहे.
[jwplayer hpuMDSji-1o30kmL6]