व्हॉट्स अ‍ॅपवरून पतीकडे दहा लाखाची मागणी
पतीकडून दहा लाख रुपये उकळण्यासाठी मीरा रोड येथील एका महिलेने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला. परंतु पोलिसांनी शिताफीने तपास करत महिलेचा हा बनाव उघडकीस आणला आहे. या महिलेला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिचा अधिक तपास करण्यात येत आहे.
मीरा रोड येथील विजय पार्क परिसरात राहणारी व त्याच परिसरात शिकवणी वर्ग घेणारी महिला रविवारी दिवसाढवळ्या अचानक गायब झाली. दुपारी उशिरापर्यंत ही महिला घरी न आल्याने तिचा पती काळजीत पडला. याच वेळी त्याच्या मोबाइलमधील व्हॉट्स अ‍ॅपवर पत्नीच्या मोबाइलवरून संदेश पाठविण्यात आला. तुमची पत्नी आमच्या ताब्यात असून तिला सोडण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची मागणी या संदेशात करण्यात आली होती. संदेशासोबतच पत्नीचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेतील छायाचित्रेही तिच्या पतीला पाठविण्यात आली.
पतीने तातडीने काशी मीरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पत्नीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी महिलेच्या मोबाइलच्या लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. सुरुवातीला तिचे लोकेशन भाईंदरच दाखवत होते. मात्र नंतर हे लोकेशन सातत्याने बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. मुंबई तसेच मुंबईबाहेरच्या विविध भागांत मोबाइलचे लोकेशन दिसून येत असल्याने पोलिसांनी अखेर सहा तपास पथके महिलेच्या शोधार्थ रवाना केली.
या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना सुरुवातीपासूनच होता. महिलेचे भररस्त्यात दिवसाढवळ्या अपहरण झाल्याची बाब पोलिसांना खटकत होती. शिवाय अपहरण झालेल्या ठिकाणीदेखील पोलिसांना कोणीही साक्षीदार देखील मिळाला नव्हता. महिलेने अपहरणाचा बनाव कसा रचला, तिच्या सोबत आणखी कोणी यात सहभागी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

३० तास शोधमोहीम
या दरम्यान महिलेच्या पतीला त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपवर संदेश येतच होते. सतत तीस तासांहून अधिक काळ माग काढल्यानंतर पोलीस अपहरण कर्त्यांपर्यंत जाऊन पोहोचले, मात्र त्या कथित अपहरणकर्त्यांला पाहून पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. अपहरणकर्ता दुसरा कोणी नसून स्वत: ती महिलाच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी महिलेला मीरा रोड रेल्वे स्थानकातून ताब्यात घेण्यात आले. ही महिला लोकल पकडण्याच्या तयारीत होती. या महिलेला ताब्यात घेऊन सध्या तिची चौकशी सुरू आहे.