नियमित धूर फवारणी करण्याकडे कडोंमपाचे दुर्लक्ष; वातावरण डास उत्पत्तीस पोषक
कल्याण डोंबिवली शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. संध्याकाळी डासांचे जथ्थेच्या जथ्थे घरात शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. प्रभागात धूर फवारणी अथवा कीटकनाशक फवारणी करण्याविषयी नागरिक लोकप्रतिनिधींना विनवणी करीत असले तरी त्याचा काहीएक उपयोग होताना दिसत नाही. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मात्र दर आठवडय़ाला प्रत्येक प्रभागात फवारणी केली जात असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात महापालिका प्रशासन कीटकनाशक फवारणीविषयी उदासीन असल्याचे नागरिकांचा आरोप आहे.
पहाटे थंडी, दुपारी थोडा उन्हाचा कडाका कधी ढगाळ वातावरण शहरात पहावयास मिळत आहे. असे वातावरण डासांच्या उत्पत्तीस पोषक असल्याने शहरात डासांचे प्रमाण अचानक वाढले आहे. खाडी किनारा, नाला, झोपडपट्टी या भागांत डासांची झुंबडच्या झुंबड सायंकाळच्या वेळी पहावयास मिळत आहे. तसेच शहरीभागात सोसायटीच्या आवारात उभ्या केलेल्या गाडय़ा, साचलेले गटाराचे पाणी, कचरा यावर डासांची पैदास जास्त दिसत आहे. सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान घराचे दरवाजे, काचा खिडक्या सर्व बंद करून बसावे लागते. अन्यथा घरात डासांचा शिरकाव झालाच समजा, असा अनुभव शहरातील एक रहिवासी कल्पना गोरे यांनी सांगितला. सोसायटय़ांच्या आवारात आठवडय़ातून एकदा धूर फवारणी किंवा कीटकनाशक फवारणी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
याविषयी पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी प्रत्येक प्रभागाची स्वतंत्र हजेरी शेड असून प्रभागाचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार दर आठवडय़ाला फवारणी होत असल्याचे उत्तर देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात नियमित फवारणी होत नसल्यानेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॅट’ची विक्री वाढली
आता घरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या औषधांनाही ते दाद देत नाहीत. त्यामुळे डासांना मारण्यासाठी इलेक्ट्रिकची बॅट वापरली जाते. त्यामुळे अशा बॅटच्या विक्रीत वाढ झाली आहे. दरदिवशी पाच ते सहा बॅटची विक्री होत असून हे प्रमाण जानेवारीपासून वाढले असल्याचे विक्रेते राजू दुबे याने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mosquitoes prevalence increasing in dombivali