बीएसएनएलने महावितरणचे ५० लाखांचे देयक थकवले; सरकारी कार्यालयांना फटका

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्पेश भोईर, वसई

वसई तालुक्यातील भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) सेवेचा बोजवारा उडाला असून वारंवार दूरध्वनी सेवा खंडित होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून बीएसएनएलने महावितरणाचे ५० लाखांहून अधिक रकमेची वीजदेयके थकवल्याने महावितरणने बीएसएनएलचा वीजपुरवठा खंडित केला आहे. परिणामी सेवा ठप्प पडत आहे. याचा सर्वाधिक फटका सरकारी कार्यालयांना बसत असून तेथील दूरध्वनी सेवा बंद पडलेली आहे.

वसई तालुक्यात मोठय़ा संख्येने बीएसएनएलचे ग्राहक आहेत. वसईतील पारनाका, पापडी, देवतलाव, माणिकपूर, नायगाव, जुचंद्र, वसई पूर्व, गोखिवरे, सातिवली, वालीव, शिरसाड, विरार पूर्व, विरार पश्चिम, बोळिंज, आगाशी, नालासोपारा पश्चिम या ठिकाणी बीएसएनएलची त्या त्या विभागानुसार उपकेंद्रे आहेत. या केंद्रांतून आजूबाजूच्या परिसरामध्ये सेवा पुरवली जाते. परंतु काही दिवसांपासून बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडालेला आहे. कंपनीच्या सुरू असलेल्या सावळ्यागोंधळामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा प्रचंड फटका बसला आहे. वारंवार दूरध्वनी सेवा खंडित होत आहे. अनेक उपकेंद्रांच्या अखत्यारीतील दूरध्वनी सेवा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत.

अनेक उपकेंद्रांतील वीजदेयक थकीत असल्याने काही ठिकाणी वीजजोडण्या काढून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे येथील ग्राहकांना याचा मोठा फटका बसू लागला आहे.

अनेक उपकेंद्रांचे मोठय़ा प्रमाणात वीजदेयक थकल्याने महावितरण कंपनीच्या वतीने काही ठिकाणची वीजजोडणी काढून टाकण्यात आली होती. त्यामुळे याचा फटका सर्वसामन्य ग्राहक, सरकारी कार्यालये, विविध प्रकारचे विभाग, राष्ट्रीय बँका, ग्रामीण रुग्णालयांना बसू लागला आहे. याचा परिणाम सरकारी कार्यालयात मोठय़ा प्रमाणात दिसून आला. ऑनलाइन पद्धतीने चालणारी कामेही ठप्प होऊ लागल्याने नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागला आहे.

पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने वीजदेयक भरणेही आता बीएसएनएल कंपनीला अडचणीचे झाले आहे. वीजदेयक गेल्या चार महिन्यांपासून थकीत असल्याने तेही हळूहळू भरण्याचे काम सुरू असल्याचे वसई बीएसएनएल विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. याआधी नालासोपारा पश्चिम, बोळिंज, देवतलाव, पापडी, सातिवली या उपकेंद्रावरील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे जनरेटरच्या साहाय्याने शहरातील दूरध्वनी सेवा चालवली जात होती. पंरतु ती सेवाही जास्त वेळ चालवू शकत नसल्याने सध्या अनेक अडचणींचा सामना वसईच्या बीएसएनएल केंद्रांसह ग्राहकांना करावा लागत आहे.

५० लाखांची थकबाकी

गेल्या चार महिन्यांपासून बीएसएनएल कंपनीने महावितरण कंपनीचे ५० लाखाचे वीजदेयक थकवले आहे. त्यासाठी वेळोवेळी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत, तसेच लवकरात लवकर वीज भरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. आर्थिक वर्षांतील शेवटचा महिना असल्याने वीजदेयकांच्या वसुलीचे काम जोरदार सुरू आहे. त्यामुळे वीजदेयक न भरलेल्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळेच बीएसएनएलच्या काही उपकेंद्रांतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

वेतनही रखडले

बीएसएनएल कंपनीमध्ये निधीची उपलब्धता कमी असल्याने मागील महिन्यापासून कर्मचारी वर्गाचे वेतनही थकलेले आहे. जसा जसा निधी उपलब्ध होत आहे त्यानुसार वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी वापरली जात आहे. जेणे करून बीएसएनएलची दूरध्वनी सेवा बंद होऊ  नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या अनेक विविध खासगी कंपन्या उदयास येत असल्याने मोठय़ा प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. त्याचा परिणाम होऊ  लागला आहे.

निधीअभावी अनेक ठिकाणची सेवा ही अधूनमधून बंद होत असते. महावितरण कंपनीचे वीजदेयक थकल्याने वीजपुरवठा खंडित होत असतो. यासाठी महावितरण विभागाचे जे काही वीजदेयक थकीत आहे ते लवकरात लवकर भरण्यात येणार आहे. लवकरच बीएसएनएलची सुविधा पूर्णपणे ग्राहकांसाठी सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

– विनोद पटनी, बीएसएनएल उपमहानिबंधक, पालघर विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl cut power supply of bsnl due to fail to pay 50 lakh electricity bills