शहरातील सर्वात वेगाने विकसित होणारा भाग म्हणजे कात्रप परिसर. या ठिकाणी उभ्या राहात असलेल्या गृहसंकुलांमुळे येथील लोकसंख्याही झपाटय़ाने वाढत आहे. सुमारे ३० हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या या भागातील नागरिकांना सध्या मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी पालिका प्रशासन आणि नगरसेवक कमी पडत असल्याचे जाणवते. त्यामुळे परिसर तसा चांगला, पण समस्यांनी वेढला, अशी काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
कात्रप गावाच्या पार डोंगरापर्यंत इमारती झाल्या आहेत. बहुमजली इमारती आणि गृहसंकुलांची जणू स्पर्धाच येथे सुरू आहे. परिणामी नागरी सोयीसुविधांवर त्याचा ताण पडत आहे. पिण्याच्या पाण्याबरोबर रस्ते, पथदिवे, शाळा, मैदान, गावातील तळ्याकडे दुर्लक्ष, शिरगाव आणि कात्रप नाल्यांना संरक्षक भिंत नाही, विरंगुळ्याची साधने नाहीत आदी प्रमुख प्रश्नांबरोबर चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे.  
या भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. पावसाळ्यातही काही परिसरांत पाणी येत नव्हते. त्यामुळे त्रस्त झालेल्या येथील नागरिकांनी मोर्चाही काढला होता. मोहपाडा या आदिवासी पाडय़ात गेली अनेक वर्षे पिण्याचे पाणीच मिळत नाही. दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कीर्ती पोलीस लाइनजवळ २० लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला आहे. मात्र या जलकुंभाला जोडणाऱ्या जलवाहिन्यांचे काम बाकी आहे. येत्या दोन महिन्यांत ते पूर्ण झाल्यास येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
कात्रपमधूनच कर्जत-पुण्याकडे जाणारा रस्ता मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून करण्यात आला आहे. हा रस्ता प्रशस्त झाल्याने येथील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटली आहे; परंतु अनेक भागांतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे. या रस्त्यांच्या कामाचा दर्जा चांगला नसल्याने काही महिन्यांतच नवीन रस्त्यावर खड्डे पडतात, अशी नागरिकांची तक्रार आहे. कात्रप गावाच्या बाहेरून जाणारा रिंगरोड माणकीवली येथे अडला आहे. या रस्त्याचे काम प्रशासकीय इच्छाशक्ती नसल्यानेच थांबल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कात्रप परिसरातील ठरावीक शाळांवरच प्रवेशाचा ताण पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी एखाद-दोन चांगल्या शाळा सुरू व्हाव्यात, जेणेकरून प्रवेशाचा प्रश्न सुटेल. सध्या नागरिकांना आपल्या पाल्याच्या शाळाप्रवेशासाठी राजकीय मंडळींकडे खेटे मारावे लागत आहेत. या परिसरात चांगले शॉपिंग सेंटर, सिनेमा-नाटय़गृहांबरोबरच विरंगुळ्यासाठी चांगला बगिचा व्हावा.
 – एन. जोशी, नागरिक

माऊलीनगरच्या मागील बाजूस असणाऱ्या रस्त्यावर पथदिवे नाहीत. येथील मोकळ्या जागेत सांडपाणी साठून राहत आहे. तसेच हा भाग खोलगट असल्याने गणेशघाट आणि वरील भागातून येणारे सांडपाणी निरामय सोसायटीच्या जमिनीवरील पाण्याच्या टाकीत झिरपत आहे.      -सोसायटय़ांमधील नागरिक
समीर पारखी, बदलापूर