ठाणे : महापालिकेच्या वेशीवर असलेल्या दिवा भागात गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असून याबाबत सातत्याने तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे भाजपने बुधवारी पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी स्थानिकांनी मडकी फोडून तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.
भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात भाजप पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. दिवा परिसरातील पाणीटंचाईविरोधात भाजपने यापूर्वी अनेकदा आंदोलने केली. त्यानंतरही पाणीटंचाई कायम राहिल्यामुळे भाजपने नितीन कंपनी जंक्शनहून महापालिका मुख्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. या मोर्चात नागरिकांनी घोषणाबाजी करत पाणीटंचाईच्या निषेधार्थ मडकी फोडून संताप व्यक्त केला. शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली. त्यावेळी टंचाईग्रस्त भागासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले.
दिवा भागासाठी ३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा मंजूर आहे. सद्यस्थितीत २९ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होत आहे. जलवाहिन्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर या भागांचा पाणी पुरवठा सुरळीत होईल. करोना काळ आणि ठेकेदाराचे देयक थकल्यामुळे कामास उशीर झाल्याची कबुली पालिका अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. त्यावर जलवाहिन्यांची कामे पूर्ण होईपर्यंत मंजूर असलेला ३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्याची तसेच ठेकेदाराची देयके देऊन लवकर काम पूर्ण करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली.
पाणी पुरवठा योजनेची कामे महिनाभरात उरकून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच भविष्यातील गरज ओळखून जलकुंभासाठी आरक्षित असलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी जलकुंभांची उभारणी करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. रात्री १२ वाजेनंतर पाणी सोडू नये अशी मागणीही त्यांनी केली.
माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी जलकुंभाच्या उभारणीसाठी स्वत:च्या मालकीची १० गुंठे जागा देण्याची घोषणा यावेळी केली. यापुढील काळात हा प्रश्न सुटला नाहीतर आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा आमदार निरंजन डावखरे यांनी दिला. तहानलेल्या दिव्यासाठी आणखी लढा तीव्र केला जाईल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
नवीन जोडणीसाठी
दिव्यात पाणी पुरवठय़ासाठी १८ इंची जलवाहिनी आहे. या जलवाहिनीवरून बेकायदा नळजोडणी दिली जात आहे. माजी नगरसेवकाची माणसे एक लाख रुपये घेऊन ही नळ जोडणी करून देतात, असा गंभीर आरोप दिवा मंडल अध्यक्ष रोहिदास मुंढे यांनी केला. तसेच टँकरमाफिया देखील पाणी चोरून विकत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.