अंबरनाथ:- नेवाळी ते काटई दरम्यानचा प्रवास म्हणजे आज एक मानसिक परीक्षा ठरत आहे. कर्मचाऱ्यांना कामावर, विद्यार्थ्यांना शाळेत, तसेच नागरिकांना इतर महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी जीवाच्या आकांताने आज वाट काढावी लागत आहे. अवघ्या १०-१५ मिनिटांत पूर्ण होणारा हा प्रवास आज पुन्हा एकदा पाऊण ते एक तास घेत असल्याने सर्व वाहनचालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक वाहनचालकांनी खोणी चौक येथे आपली गाडी सोडून पुढे जाऊन दुसऱ्या गाड्यांनी प्रवास केला आहे.
आज सकाळपासूनच या मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे. हजारो वाहनचालक ताटकळत रस्त्यावर उभे आहेत. या भीषण वाहतूक कोंडीमुळे अनेकांनी ऑफिस वेळा चुकवल्या, शाळेतील पालक मुलांना उशिराने सोडत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या मार्गावर खोणी चौकात भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. तर याच शेजारी असलेल्या माढा वसाहतीच्या समोरच मोठाले खड्डे असल्याने या वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. या कोंडीचे चित्र काही आजचेच नाही, पण आजचा दिवस मात्र विशेष त्रासदायक ठरत आहे. “या मार्गावरून प्रवास म्हणजे दररोज सकाळचे युद्ध ” अशी प्रतिक्रिया वाहतूक कोंडीत अडककेले प्रवासी देत आहेत.
नेवाळी ते काटई हा मार्ग सध्या विकासाच्या नावाखाली अर्धवट कामांमध्ये अडकला आहे. रस्ता अरुंद असून वाढत्या वाहन संख्येला तो अजिबात पुरत नाही. अनधिकृत पार्किंग, ठिकठिकाणी खड्डे, वाहतुकीचा अभाव असलेली सिग्नल यंत्रणा, आणि अपुऱ्या ट्रॅफिक पोलिसांची तैनाती या सर्वांनी मिळून ही परिस्थिती बिकट झाली आहे आहे.