कचऱ्यापासून १२ हजार मेट्रिक टन खत; अनेक जिल्ह्य़ांतील शेतकऱ्यांकडून मागणी
भगवान मंडलिक
कल्याण : कल्याण डोंबिवली पालिकेच्या घनकचरा विभागाने दोन वर्षांत कचऱ्यापासून १२ हजार मेट्रिक टन खताची निर्मिती केली असून हे खत बागायतदार, व्यावसायिक शेतकऱ्यांना नाममात्र दराने देण्यात येत आहे. या खताला राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांकडून मागणी आहे. आतापर्यंत २०० टन खताची विक्री झाली असल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांनी दिली.
कल्याण, डोंबिवली शहर कचरामुक्त करण्यासाठी दोन वर्षांपासून घनकचरा विभागाने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपायुक्त कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले. २५ वर्षांत यशस्वी न झालेली ओला, सुका कचरा वर्गीकरणाची प्रक्रिया अमलात आणली. या पद्धतीमुळे १५० मेट्रिक टन कचरा कमी झाला. प्लास्टिकयुक्त वस्तूंचे कचऱ्यातील प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झाले. संपूर्ण पालिका क्षेत्रात ६५० टन कचरा तयार होत असून त्याचे नऊ प्रकारात वर्गीकरण केले जाते.
टाकाऊ वस्तूंचा कचरा भंगार विक्रेत्यांना विकून त्या माध्यमातून पालिकेला स्वामीत्वधन मिळते. उंबर्डे, बारावे प्रकल्पांमध्ये कचऱ्यापासून खत तयार केले जाते. या ठिकाणी दोन वर्षांत १२ हजार मेट्रिक टन खतनिर्मिती केली आहे, असे उपायुक्त कोकरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना हे खत उपलब्ध करून दिले तर सेंद्रिय खतावर सेंद्रिय शेती बहरेल हा विचार करून आयुक्त सूर्यवंशी यांच्या सूचनेवरून उपायुक्त कोकरे यांनी कल्याण, नवी मुंबई, भायखळा येथील बाजार समित्यांमध्ये दररोज येणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना पालिका उत्पादित खताची माहिती दिली. शेतकऱ्यांनी पालिकेच्या प्रस्तावाला मान्यता देऊन खत खरेदी सुरू केली.
दोन रुपये किलो दराने खत शेतकऱ्यांना देण्यात येते. आतापर्यंत २०० टन खताची विक्री झाली आहे तर, ५०० टन खताची नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे, इंदापूर, सोलापूर, सातारा, नगर, नाशिक, जुन्नर भागांतील हे शेतकरी आहेत. खा. डॉ, श्रीकांत शिंदे यांनी ५० टन खत खरेदी केले. महिनाभरात खताची विक्री एक हजार टनापर्यंत जाईल, असे कोकरे यांनी सांगितले.
शेतीतील उत्पादनाला सेंद्रिय खत दिले तर सेंद्रिय पद्धतीची लागवड होईल. आरोग्यासाठी असा भाजीपाला हानीकारक नसतो. ही संकल्पना आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी मांडली. शेतकऱ्यांना पालिका निर्मित खत देण्याचा निर्णय घेण्यात आला. – डॉ. रामदास कोकरे, उपायुक्त, घनकचरा विभाग