मुरबाडच्या पदय़ाची वाडी येथे यशस्वी प्रयोगलोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर : मुरबाड, शहापूर तालुक्यांमधील पाणीटंचाईवर आता सामाजिक संस्थांनी उपाय शोधण्यास सुरुवात केली आहे. मुरबाडच्या पद्याची वाडी येथे रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई इंडस्ट्रियल एरियाच्या माध्यमातून पर्जन्य जलसंधारणाचा उपक्रम हाती घेण्यात आला. गेल्या वर्षांत सुरू झालेल्या या प्रयोगामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढून कूपनलिका आणि विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना आता उन्हाळ्यातही जवळच्याच कूपनलिका आणि विहिरींमधून पाण्याची उपलब्धता होत आहे.

शहरी भागात मोकळ्या जमिनींना काँक्रीट आणि पेव्हर लाद्यांचे आच्छादन बसू लागल्याने शहरातील कूपनलिका आणि विहिरी आटू लागल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कूपनलिकांचे पाणी कमी होत असल्याचे दिसून आले होते. सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या कोकण विभागात मोडणाऱ्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये मार्च महिन्यानंतर टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. गेल्या काही वर्षांत विविध सामाजिक संस्था, संघटनांनी ग्रामीण भागातील पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये फसलेला पर्जन्य जल संधारणाचा प्रकल्प नुकताच मुरबाड तालुक्यातील पद्याची वाडी येथे राबवण्यात आला. येथील कूपनलिका आणि विहीर मार्च महिन्यातच सुकत होती. त्यामुळे ग्रामस्थांना दूरवरच्या विहिरीवर पाण्यासाठी अवलंबून राहावे लागत होते.

वाडीतील समाज मंदिर तसेच शाळांच्या छतांवर पडणारे पाणी कूपनलिका पुनर्भरणासाठी वळवण्यात आले. अतिरिक्त पाणी विहिरीत सोडण्याची व्यवस्था करण्यात आली. जलवाहिन्यांद्वारे हे पाणी कूपनलिकेच्या शोषखड्डय़ाजवळ नेण्यात आले. वाडीत आणखी दोन पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या आहेत. पर्जन्य जलसंधारणाच्या कामामुळे कूपनलिका आणि विहिरीच्या पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही येथील ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत नाही. येथील रहिवाशांना आता बाराही महिने पुरेसे पाणी मिळेल, असा विश्वास जलव्यवस्थापन तज्ज्ञ हेमंत जगताप यांनी व्यक्त केला आहे.