सकाळी ७ ते ३ डावीकडे; दुपारी ३ ते १२ उजवीकडे पार्किंगला मुभा
ठाणे शहरातील वाहतुकीची धमनी अशी ओळख असणाऱ्या गोखले मार्गावरील वाहने पार्किंगचा पेच सोडवण्यासाठी तसेच स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी या रस्त्यावर दिवसभरात आठ तासांनी पार्किंगचा बाजूबदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस या रस्त्यावर सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत रस्त्याच्या डावीकडे, तर दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या उजवीकडे वाहने उभी करता येणार आहेत. या निर्णयाचा स्थानिकांना फायदा होणार असला तरी या रस्त्यावर वाहने उभी करून दिवसभर बाहेर जाणाऱ्या नोकरदारांसाठी आता मोठा पेचप्रसंग उभा ठाकणार आहे.
गोखले रस्ता हा सर्वात महत्त्वाचा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. ठाणे रेल्वे स्थानकापासूनच सुरू होत असल्याने ठाणे शहरातील विविध भागांतून येणारे वाहनचालक सम-विषम तारखेनुसार या रस्त्यावर आपली वाहने उभी करून उपनगरी रेल्वेने मार्गस्थ होत असतात. त्यामुळे ही वाहने संध्याकाळपर्यंत त्याच ठिकाणी उभी असतात. याचा मोठा फटका स्थानिक रहिवाशांना बसत असून त्यांची वाहने उभी करण्यास अडसर होतो, तसेच रस्त्यावर वाहतूक कोंडीही होते.
या पाश्र्वभूमीवर गोखले रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये व वाहतूक सुरळीत राहावी म्हणून पी-१, पी -२ प्रमाणे वाहन पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार ठाणे स्थानकाकडून टेलिफोन नाक्याकडे जाणाऱ्या गोखले रस्त्यावर हायमास्ट ते टेलिफोन नाकादरम्यान दुकाने, रहिवासी सोसायटीचे गेट, दवाखाने, गल्लीचे मार्ग, रस्त्याचे कॉर्नर सोडून सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूस व दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत उजव्या बाजूस दुचाकी व हलक्या वाहनांस म्हणजेच कार, जीप यांना पार्किंग करण्यास मुभा देण्यात आली आहे. ही अधिसूचना पुढील १५ दिवस प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. याविषयी नागरिकांना काही सूचना अथवा हरकती असल्यास त्याची लेखी तक्रार पोलीस उपायुक्त कार्यालय, वाहतूक विभाग, तीन हात नाका, ठाणे येथे पाठवण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. या अधिसूचना पोलीस, अग्निशमन विभाग आणि रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी स्पष्ट केले आहे.
वाहतूक पोलिसांच्या या निर्णयाचा मोठा फटका ठाण्याच्या अन्य भागांतून वाहने घेऊन स्थानक परिसरात येणाऱ्या नोकरदार मंडळींना बसणार आहे. या मंडळींना दुपारी तीनच्या आतच आपली वाहने हलवून दुसऱ्या बाजूला उभी करावी लागणार आहेत, परंतु उशिरा ठाण्यात परतणाऱ्यांना हे शक्य होणार नसल्याने त्यांना अन्यत्र निवारा शोधावा लागणार आहे.